

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मनहास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष असतील, हे रविवारी निश्चित झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मंडळाच्या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपेपर्यंत अध्यक्षपदासाठी मनहास यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. ऑगस्टमध्ये रॉजर बिन्नी यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. मनहास यांनी रविवारी दुपारी अंतिम मुदतीपूर्वी बीसीसीआयच्या मुख्यालयात अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
या दरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मंडळाच्या सर्वोच्च प्रशासकीय मंडळात आणखी एका माजी क्रिकेटपटूचा समावेश होण्याची शक्यता आहे. यात भारताचे माजी फिरकीपटू रघुराम भट यांची खजिनदार म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. भट सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.
पुढील महिन्यात 46 वर्षांचे होणारे मनहास क्रिकेट प्रशासनाशी जवळून जोडले गेले आहेत. ते जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघटनेची देखरेख करणार्या बीसीसीआय नियुक्त उपसमितीचे सदस्य आहेत. जम्मूमध्ये जन्मलेले मनहास 2015 मध्ये दिल्लीहून जम्मू आणि काश्मीरला स्थलांतरित झाले आणि त्यापुढील वर्षात त्यांनी निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांसाठी प्रशिक्षकाची भूमिका बजावली असून बांगला देश यू-19 संघाचे फलंदाजी सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे.
एक यशस्वी देशांतर्गत क्रिकेटपटू म्हणून मनहास यांनी 1997 ते 2017 दरम्यान 157 प्रथम श्रेणी सामने खेळले. यात त्यांनी 9714 धावा केल्या. त्यांनी 130 लिस्ट ए सामने (4126 धावा) आणि 91 टी-20 सामने (1170 धावा) देखील खेळले. यामुळे ते भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक ठरतात. देवजित सैकिया बीसीसीआयचे सचिव म्हणून कायम राहतील, तर शुक्ला उपाध्यक्षपदी कायम राहतील, अशी माहिती आहे. सध्याचे खजिनदार प्रभतेज भाटिया संयुक्त सचिवपदाची जबाबदारी स्वीकारतील, तर रोहन देसाई यांच्या जागी त्यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, सौराष्ट्रचे माजी कर्णधार जयदेव शहा मिझोरामच्या खैरल जमाल मजुमदार यांच्या जागी अॅपेक्स कौन्सिलमध्ये सामील होईल, अशी शक्यता असून मजुमदार आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये जाण्याची शक्यता आहे.
शनिवारी दिल्लीत झालेल्या एका अनौपचारिक बैठकीत मनहास यांच्या नावावर सहमती झाली. या बैठकीत आयसीसीचे अध्यक्ष जय शहा, राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली आणि मंडळाचे माजी सचिव निरंजन शहा यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. विविध पदाधिकार्यांसाठी निवडणुका 28 सप्टेंबर रोजी मुंबईत बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहेत. तथापि, नवीन उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यास, दिल्लीच्या बैठकीत चर्चा झालेल्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मनहास यांच्याकडे प्रशासकीय आणि क्रिकेट दोन्हीचा अनुभव आहे. त्यांनी बीसीसीआयच्या एजीएममध्ये जम्मू आणि काश्मीरचे प्रतिनिधित्व केले आहे. मैदानावर ते भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह व्यक्तींपैकी एक मानले जात होते. 1997-98 मध्ये पदार्पण केलेल्या मनहास यांनी राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गजांच्या युगात दिल्लीसाठी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून योगदान दिले. शिवाय, त्यांनी दिल्लीचे यशस्वी नेतृत्व केले, 2007-08 मध्ये रणजी करंडक जिंकवून दिला आणि त्या हंगामात 57.56 च्या सरासरीने 921 धावा केल्या. एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून, मनहास मुख्यतः उजव्या हाताचे फलंदाज होते. ते ऑफ-स्पिन गोलंदाजीही करायचे आणि क्वचितप्रसंगी यष्टिरक्षणही करायचे. त्यांनी 157 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9,714 धावा केल्या. यात 45.82 च्या सरासरीने 27 शतके आणि 49 अर्धशतके समाविष्ट आहेत.