Asia Cup 2025 IND vs PAK Match  Canva Image
स्पोर्ट्स

Asia Cup IND vs PAK : सध्याची आमची पॉलिसी... पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत BCCI नं हात झटकले, केंद्राकडं केलं बोट

आशिया कप २०२५ चा भारत - पाकिस्तान सामना हा १४ सप्टेंबरला दुबईत खेळवण्यात येत आहे.

Anirudha Sankpal

Asia Cup 2025 IND vs PAK Match :

आशिया कप २०२५ चा भारत - पाकिस्तान सामना हा १४ सप्टेंबरला दुबईत खेळवण्यात येत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानसोबत कोणत्याच पातळीवर संबंध ठेवले जाऊ नये अशी जनभावना दिसत आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये देखील भारतानं पाकिस्तानविरूद्ध खेळणं टाळावं असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना होणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र हा सामना ठरल्या वेळी अन् ठरल्या ठिकाणी होणार आहे. यावरून काही माजी खेळाडूंनी टीका केली आहेत. याबाबत बीसीसीआयचे सचिव देवाजीत सिक्का यांनी बीसीसीआयची बाजू मांडली.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआय सचिव देवाजीत सिक्का यांनी केंद्राकडे बोट करत पाकिस्तानसोबत खेळण्याबाबतची पॉलिसी केंद्र सरकार ठरवते आणि आशिया कपमधील भारत पाकिस्तान दरम्यान होणारा सामना हा देखील केंद्र सरकारच्या सध्याच्या धोरणानुसारच असल्याचं सांगितलं.

ते म्हणाले, 'बीसीसीआयच्या दृष्टीकोणातून पाहायचं झालं तर आम्ही केंद्र सरकारच्या निर्णयाचं पालन करतो. बहुराष्ट्रीय स्पर्धांमधील भारतीय संघाचा सहभाग हा केंद्र सरकारच्या धोरणानुसारच आहे. या धोरणात सध्या तरी बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताशी चांगले संबंध नसलेल्या देशांसोबत खेळू नये असं कोणतंही बंधन नाहीये. त्यामुळं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाला प्रत्येक सामना हा खेळावाच लागणार आहे.

बीसीसीआयने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला तर भारतीय संघावर कारवाई देखील होऊ शकते असं सांगितलं.

याबाबत बोलताना सिक्का म्हणाले, आयसीसी किंवा एसीसी आयोजित करत असलेल्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतानं जर एखाद्या विशिष्ट संघाविरूद्ध न खेळता त्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला तर बीसीसीआयवर कारवाई देखील होऊ शकते.'

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना हा सर्वात हाय व्होल्टेज सामना असतो. त्यामुळं या सामन्याकडे आर्थिक दृष्टा देखील पाहिलं जातं. आयोजकांसाठी हा सामना सर्वाधिक कमाई करून देण्याचं साधन असतं. त्यामुळं हा सामना कोणत्याही परिस्थिती व्हावा असा सर्वांचा प्रयत्न असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT