

ब्युनोस आयर्स : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने 2026 च्या फिफा विश्वचषकातील आपल्या सहभागाबद्दल दिलेल्या ‘प्रामाणिक’ प्रतिक्रियेने त्याच्या चाहत्यांना निराश केले आहे. वेनेझुएला विरुद्धच्या 3-0 अशा विजयानंतर त्याने हे विधान केले. या सामन्यात मेस्सीने दोन, तर लौटारो मार्टिनेझने एक गोल केला.
38 वर्षीय मेस्सीला पुढील विश्वचषकात खेळण्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, माझ्या वयानुसार, असे विचार करणे स्वाभाविक आहे की, मी कदाचित आणखी एक विश्वचषक खेळणार नाही. मी रोज स्वतःशी प्रामाणिक राहून खेळण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा मला चांगले वाटेल, तेव्हाच मी खेळाचा आनंद घेईन; पण जेव्हा मला चांगले वाटत नाही, तेव्हा मी मैदानात नसलेलं बरं. 2026 च्या विश्वचषकापर्यंत मेस्सीचा 39 वा वाढदिवस जवळ आलेला असेल.
यासंदर्भात त्याने कोणताही निश्चित निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले. मी अजून विश्वचषकाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मी एक-एक सामना खेळून हा हंगाम पूर्ण करेन आणि सहा महिन्यांनंतर मला कसे वाटते हे पाहून निर्णय घेईन, असे त्याने सांगितले. मेस्सीच्या या वक्तव्यामुळे फुटबॉल जगतात त्याच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.