

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आशिया चषक 2025 स्पर्धेची सुरुवात येत्या 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेचा थरार यूएईमध्ये रंगणार आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन टी-20 फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. सर्व 8 संघांनी या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. स्पर्धेची सुरुवात हाँगकाँग आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणार्या सामन्याने होणार आहे. तर भारतीय संघ 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत सहभाग घेणार्या 3 संघांमध्ये 14 भारतीय वंशाचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
आशिया चषक 2025 स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तानसह, बांगला देश, श्रीलंका, यूएई, ओमान, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे 8 संघ पात्र ठरले आहेत. या 8 पैकी ओमान, हाँगकाँग आणि यूएई संघांत 14 भारतीय वंशाचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतात क्रिकेटचा स्तर खूप जास्त उंचावला आहे. त्यामुळे काही खेळाडूंना वर्षानुवर्षे चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नाही. अशावेळी खेळाडू देश सोडून दुसर्या देशाकडून खेळण्याचा निर्णय घेतात.
आशिया चषक 2025 स्पर्धेसाठी हाँगकाँगच्या संघात स्थान मिळालेला यष्टिरक्षक फलंदाज अंशुमन रथ हा मूळचा भारतीय आहे. अंशुमनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ओडिसा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यासह मुंबईकर किंचित शाह आणि आयुष शुक्ला यांचादेखील समावेश आहे. यासह भारतीय संघाविरुद्ध पहिला सामना खेळणार्या यूएईच्या संघातदेखील 6 भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात अलीशान शराफू, राहुल चोपडा, आर्यंश शर्मा, ध्रुव पाराशर, हर्षित कौशिक आणि सिमरनजित सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे.
आशिया चषकासाठी ओमानचा संघदेखील जाहीर करण्यात आला आहे. ओमानच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारतीय वंशाचा खेळाडू जतिंदर सिंहकडे सोपवण्यात आली आहे. या संघात भारतीय वंशाच्या विनायक शुक्ला, आशिष ओडेडरा, करन सोनावळे, आर्यन बिष्ट यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. यासह 3 संघांत भारतीय वंशातील 14 खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
ओमान : विनायक शुक्ला, आशिष ओडेडरा, करन सोनावळे, आर्यन बिष्ट, जतिंदर सिंह
यूएई : हर्षित कौशिक, ध्रुव पाराशर, आर्यंश शर्मा, राहुल चौप्रा, अलीशान शराफू, सिमरनजित सिंग
हाँगकाँग : किंचिच शाह, आयुष शुक्ला, अंशुमन रथ.