टीम इंडियाचा वेगवान गाेलंदाज आकाशदीप बहिण ज्‍याेती समवेत. 
स्पोर्ट्स

Akash Deep : "माझ्‍या कॅन्‍सरची चिंता करु नकोस, तू फक्‍त.. " : आकाश दीपच्‍या बहिणीची मन हेलावणारी प्रतिक्रिया

आकाश दीपने उत्‍कृष्‍ट कामगिरी केली होती कॅन्‍सरग्रस्‍त बहिणीला समर्पित

पुढारी वृत्तसेवा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने रविवारी (दि. ७) दिमाखदार विजय मिळवला. विशेष म्हणजे बर्मिंगहॅममध्ये भारताने प्रथमच विजय मिळवला आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप ( Akash Deep). त्याच्या भेदक मार्‍यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. भारताने इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी पराभव केला. आकाश दीपच्या शानदार कामगिरीवर प्रतिक्रिया देताना त्याची बहीण ज्योती सिंग भावुक झाली. कारण आकाश दीपने सामना-विजयाची कामगिरी कॅन्सरशी झुंज देत असलेल्या आपल्या बहिणीला समर्पित केली आहे.

काय म्हणाली आकाश दीपची बहीण...

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आकाश दीपची बहीण ज्योती म्हणाली की, इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वीच आकाश दीपशी मला झालेल्या कॅन्सरविषयी चर्चा झाली होती. यावेळी माझ्या प्रकृतीची चिंता न करता देशासाठी खेळण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मी त्याला सांगितले होते. अत्यंत कठीण काळातून जात असलेल्या कुटुंबाला आकाशच्या कामगिरीमुळे मोठा आनंद झाला असल्याचेही ज्योतीने नमूद केले.

"उपचार आणखी ६ महिने चालतील, त्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू..."

विशेष मुलाखतीमध्ये ज्योती म्हणाली की, माझ्या भावाने दुसऱ्या कसोटी सामन्यात १० बळी घेतले आहेत. त्याची ही कामगिरी अभिमानास्पद आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी आम्ही त्याला विमानतळावर भेटायला गेलो होतो. मी त्याला सांगितले, "माझी काळजी करू नकोस. तू फक्त देशासाठी सर्वोत्तम कामगिरी कर. माझा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात आहे आणि डॉक्टरांनी सांगितले आहे की उपचार आणखी सहा महिने चालतील. त्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू."

अशा परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करणे खूप मोठी गोष्ट

"आकाश विकेट घेतो, तेव्हा मला खूप आनंद होतो. प्रत्येक विकेटनंतर आम्ही सर्वजण इतक्या जोरात टाळ्या वाजवून जल्लोष करतो की वसाहतीमधील शेजारी विचारतात, 'काय झाले आहे!' मला कॅन्सर झाला आहे, हे सार्वजनिकरित्या कोणालाही माहीत नव्हते. आकाश असे काही बोलेल, याची मला कल्पना नव्हती. कदाचित आम्ही याबद्दल सार्वजनिकपणे बोलण्यास तयार नव्हतो; पण ज्या प्रकारे तो भावुक झाला आणि त्याने त्याची उत्कृष्ट कामगिरी मला समर्पित केली, ही खूप मोठी गोष्ट आहे. यावरून त्याचे आमच्या कुटुंबावर आणि माझ्यावर किती प्रेम आहे, हे दिसून येते. घरातील परिस्थिती अशी असतानाही तिथे जाऊन अशी कामगिरी करणे आणि बळी घेणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तो माझ्या सर्वात जवळचा आहे," असेही ज्योतीने सांगितले.

आयपीएलदरम्यान रुग्णालयात भेट

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू असताना आकाश दीपची बहीण रुग्णालयात दाखल होती. "जेव्हा आयपीएल सुरू होते आणि तो लखनौ संघाकडून खेळत होता, तेव्हा मी कर्करोगाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होते. तरीही तो सामन्यापूर्वी किंवा नंतर मला भेटायला येत असे," असेही ज्योतीने सांगितले.

आकाश म्हणाला, "काळजी करू नकोस, देश आपल्यासोबत "

एजबॅस्टन येथे भारताच्या पहिल्या विजयानंतर आकाशशी व्हिडिओ कॉलवर बोलताना मला अश्रू आवरता आले नाहीत. सामना संपल्यानंतर आमचे व्हिडिओ कॉलवर दोनदा बोलणे झाले आणि पुन्हा सकाळी ५ वाजता पुन्हा एकदा संवाद झाला. आकाश मला म्हणाला, "काळजी करू नकोस, संपूर्ण देश आपल्यासोबत आहे. मी आता हे मनात ठेवू शकत नव्हतो. मी खूप प्रयत्न करत होतो, पण काल मी स्वतःला रोखू शकलो नाही," असेही ज्योती म्हणाली.

आकाश हाच कुटुंबाचा आधार

"असा भाऊ मिळणे दुर्मिळ आहे. तो आम्हाला खूप मदत करतो आणि आमच्याशी बोलल्याशिवाय काहीही करत नाही. तो प्रत्येक गोष्ट कुटुंबासोबत वाटून घेतो. आम्ही तीन भाऊ आणि तीन बहिणी आहोत. आमचे वडील आणि मोठे भाऊ आता या जगात नाहीत. त्यामुळे तोच आता संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळत आहे," असेही ज्योतीने स्पष्ट केले.

दुसऱ्या कसोटी सामन्यात आकाश दीपची उत्कृष्ट कामगिरी

पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे उशिरा सुरू झाला; परंतु यानंतर वेगवान गोलंदाज आकाश दीपने सुरुवातीला इंग्लंडला दोन धक्के दिले. बेन स्टोक्सने जेमी स्मिथबरोबर सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. स्टोक्सला तंबूत पाठवत वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी मोडली. लंच ब्रेकनंतर भारताने उर्वरित चार विकेट घेत दिमाखदार विजयाची नोंद केली. भारताकडून वेगवान गोलंदाज आकाश दीपने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या. आकाशने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT