

बर्मिंगहम; वृत्तसंस्था : एक-दोन नव्हे तर तब्बल 6 फलंदाज शून्यावर बाद झालेले असताना आणि समोर 587 धावांचा डोंगर असताना देखील जेमी स्मिथ-हॅरी ब्रुक यांनी इंच न इंच भूमी लढवत सहाव्या गड्यासाठी विक्रमी 303 धावांची भागीदारी साकारली आणि याच बळावर इंग्लंडने येथील दुसर्या कसोटी सामन्यातील तिसर्या दिवशी आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 407 धावा, असे चोख प्रत्युत्तर दिले. भारताने शुक्रवारी या सामन्याच्या तिसर्या दिवसअखेर 1 बाद 64 अशी सावध पण आक्रमक सुरुवात केली आणि आपली एकत्रित आघाडी 244 धावांवर नेली. दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी के. एल. राहुल 28 तर करुण नायर 7 धावांवर खेळत होते.
पहिल्या डावाअखेर 180 धावांची आघाडी प्राप्त झाल्यानंतर भारतातर्फे जैस्वाल व के. एल. राहुल यांनी 7.4 षटकांत 51 धावांची सलामी दिली. जैस्वाल 28 धावांवर टंगच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. तत्पूर्वी, इंग्लंडने 3 बाद 77 या कालच्या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केली. पण, दिवसातील दुसर्याच षटकात दोन चेंडूंत दोन फलंदाज बाद झाले आणि यामुळे त्यांची 5 बाद 84 अशी घसरगुंडी उडाली. मात्र, याचवेळी जेमी स्मिथ व ब्रुक यांची जोडी जमली आणि आपल्या चिवट, संयमी, एकाग्र फलंदाजीच्या बळावर त्यांनी भारतीय गोलंदाजांना अगदीच निष्प्रभ करुन टाकले. या सहाव्या जोडीने मजल-दरमजल प्रवास करत शतकी, द्विशतकी, अगदी त्रिशतकी भागीदारी पूर्ण करत भारतीय संघाला अक्षरश: घाईस आणले.
कधी चोरट्या एकेरी-दुहेरी धावा, कधी आक्रमक चौकार-षटकार अशा फटकेबाजीवर भर देत या उभयतांनी भारताचा मारा पूर्णपणे निष्प्रभ ठरवला. एकवेळ संघ अतिशय अडचणीत असताना स्मिथ व ब्रूक यांनी सहाव्या गड्यासाठी लक्षवेधी 303 धावांची भागीदारी करत संघाला 5 बाद 84 वरुन 6 बाद 387 धावांपर्यंत नेले. त्यांचे उर्वरित 4 फ लंदाज मात्र यात आणखी 20 धावांची भर घालू शकले. भारतातर्फे सिराजने 19.3 षटकांत 70 धावांत 6 फलंदाजांना बाद करत त्यांच्या धावसंख्येला बर्यापैकी लगाम लावला.
जेमी स्मिथने यष्टींवर टाकलेल्या चेंडूवर एक धाव घेत हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. भारताविरुद्ध सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकासाठी इंग्लंडची ही पहिलीच द्विशतकी भागीदारी ठरली आहे. या जोडीने 2014 मध्ये ट्रेंट ब्रिज येथे जो रूट आणि जेम्स अँडरसन यांच्यातील 198 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला. रूट आणि अँडरसन यांची भागीदारी कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्या गड्यासाठीची आजतागायत विक्रमी भागीदारी आहे.