Abhishek Sharma Borrow Bat: आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२६ च्या फायनल सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने धमाकेदार फलंदाजी केली. संपूर्ण स्पर्धेत अभिषेकची बॅट तळपली नव्हती. त्यामुळं तो टीकेचा धनी झाला होता. फायनलमध्ये त्याचे प्लेईंग ११ मधील स्थान देखील डळमळीत मानलं जात होतं. मात्र संघ व्यवस्थापनानं त्याच्यावर विश्वास ठेवला अन् त्यानं हा विश्वास सार्थ करून दाखवला. त्याने ५२ धावांची धडाकेबाज खेळी करत संजू सॅमसनसोबत जवळपास शतकी सलामी दिली.
फक्त २१ चेंडूत ५२ धावा करणाऱ्या अभिषेक शर्माने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. अभिषेकने १८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. टी २० वर्ल्डकप फायनलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. विशेष म्हणजे संजू सॅमसन सोबत ९६ धावांची भागीदारी रचणारा अभिषेक फायनलमध्ये आपली स्वतःची बॅट घेऊन खेळला नव्हता. त्यानं अष्टपैलू शिवम दुबेची बॅट उधारीवर घेतली होती. सामन्यानंतर अभिषेकने याबाबत खुसाला केला.
अभिषेक ने सांगितलं की, फायनल सामन्याच्या दिवशी सकाळी त्यांनी काहीतरी नवीन ट्राय करू असं ठरवलं होतं. अभिषेक म्हणाला, मी शिवम दुबेच्या बॅटने फलंदाजी केली. मी याबद्दल त्याचे आभार देखील मानले. सकाळी मला वाटलं की काहीतरी वेगळं ट्राय करावं. शुभमन गिल देखील जवळपास नव्हता. त्यामुळं मी दुबेच्या जवळ गेलो आणि त्याच्याकडून त्याची बॅट घेतली.
अभिषेक शर्माने यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये तीन सामन्यात भोपळाही फोडला नव्हता. सुरूवातीच्या तीन डावात तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतरही अभिषेक शर्माला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनानं त्याच्यावर विश्वास ठेवला. हा विश्वासच अभिषेकला आपली कामगिरी उंचावण्यास उपयोगी पडला.
अभिषेक शर्मा म्हणाला की, 'मी गेल्या एक महिन्यापासून अडचणीतून जात होतो. अशावेळी तुमच्या आसपास असणारे लोक खूप महत्वाचे असतात. मी ज्यावेळी धावा करत नव्हतो त्यावेळी संघातील सर्व खेळाडू माझ्यावर विश्वास दाखवत होते. ते म्हणत होते की तू नक्कीच चांगली कामगिरी करणार. अभिषेक शर्माने शेवटी फायनल सारख्या मोठ्या सामन्यात आपली कामगिरी उंचावली. त्याने दमदार खेळी करत भारताला विजयी पथावर मार्गस्थ केलं.