77 Runs in One Over Pudhari
स्पोर्ट्स

77 Runs in One Over: 1 ओव्हरमध्ये 77 धावा... 17 नो-बॉल, 8 सिक्स आणि 6 चौकार; बॅटींगचा भयानक थरार

77 Runs in One Over: न्यूझीलंडच्या घरगुती क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाने एका षटकात तब्बल 77 धावा दिल्या होत्या. या षटकात 17 नो-बॉल, 8 षटकार आणि 6 चौकार मारले होते.

पुढारी वृत्तसेवा

77 Runs in One Over: क्रिकेटमध्ये एका षटकात 6 चेंडूंवर 6 षटकार लागले तर जास्तीत जास्त 36 धावा होऊ शकतात, हे सर्वांनाच माहिती आहे. पण एका षटकात तब्बल 77 धावा झाल्या होत्या, असं सांगितलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही.

मात्र क्रिकेट इतिहासात अशी अविश्वसनीय घटना प्रत्यक्षात घडली आहे. तब्बल 35 वर्षांपूर्वी न्यूझीलंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाने एका षटकात 77 धावा दिल्या आणि ती ओव्हर क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी आणि धक्कादायक ओव्हर ठरली.

ही घटना 20 फेब्रुवारी 1990 रोजी न्यूझीलंडमध्ये झालेल्या शेल ट्रॉफी स्पर्धेदरम्यान घडली होती. क्राइस्टचर्च येथे वेलिंग्टन आणि कँटरबरी यांच्यात फर्स्ट क्लास सामना सुरू होता. वेलिंग्टनने विजयासाठी 291 धावांचे लक्ष्य दिले होते. सामन्यात फक्त दोन षटके बाकी होती आणि कँटरबरीला विजयासाठी अजून 95 धावा हव्या होत्या.

वेलिंग्टनने सुरुवातीला जबरदस्त गोलंदाजी करत कँटरबरीचे 8 विकेट्स 108 धावांत घेतल्या होत्या. सामना जवळपास त्यांच्या खिशात गेला होता. मात्र कँटरबरीचा यष्टिरक्षक फलंदाज ली जर्मोन आणि दहाव्या क्रमांकावरील फलंदाज रोजर फोर्ड यांनी झुंज देत सामना ड्रॉकडे नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

सामना हातातून निसटू लागल्याचे पाहून वेलिंग्टनचा कर्णधार इर्विन मॅक्सवेलने गोलंदाजीची जबाबदारी बर्ट व्हान्स याच्याकडे दिली. त्यामागचा उद्देश असा होता की फलंदाजांना मोठे फटके मारण्यास प्रवृत्त करायचे, जेणेकरून ते विकेट गमावतील आणि सामना जिंकता येईल. मात्र ही रणनीती पूर्णपणे उलटी पडली.

बर्ट व्हान्स यांनी या षटकातील पहिल्याच 17 चेंडू नो-बॉल टाकले. फलंदाज ली जर्मोनने या संधीचा पुरेपूर फायदा घेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्या षटकात तब्बल 8 षटकार आणि 6 चौकार ठोकले गेले.

या षटकात बर्ट व्हान्स यांनी एकूण 22 चेंडू टाकले. ली जर्मोनने एकट्याने 70 धावा केल्या, तर रोजर फोर्डने 5 धावा जोडल्या. याशिवाय 2 अतिरिक्त धावा मिळाल्या आणि अशाप्रकारे एका षटकात तब्बल 77 धावा झाल्या.

या धक्कादायक षटकानंतर कँटरबरीला शेवटच्या षटकात विजयासाठी फक्त 18 धावा हव्या होत्या. ली जर्मोनने पहिल्या 5 चेंडूंवर 17 धावा केल्या आणि सामना रोमांचक टप्प्यावर पोहोचला. अखेरच्या चेंडूवर फक्त 1 धाव हवी होती. मात्र त्या चेंडूवर धाव घेण्यात अपयश आले.

शेवटी कँटरबरीचा डाव 290 धावांवर थांबला आणि सामना ड्रॉ झाला. हा सामना आणि विशेषतः बर्ट व्हान्स यांचे ते षटक आजही क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र आणि अविश्वसनीय घटनांपैकी एक मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT