

लखनौ; वृत्तसंस्था : रवींद्र जडेजाची 29 चेंडूंत 43 धावांची जलद खेळी आणि आर्चर (3/20), बर्गर (2/27), ब्रिजेश (2/18) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंटस्चा 40 धावांनी धुव्वा उडवला आणि आयपीएल गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर झेप घेतली. प्रारंभी, राजस्थानने 20 षटकांत 6 बाद 159 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनौला 18 षटकांत सर्वबाद 119 धावांवरच रोखले.
विजयासाठी 160 धावांचे तुलनेने माफक आव्हान असताना लखनौला विजयाच्या आसपासही फिरकता आले नाही. सलामीवीर मिशेल मार्शने 55 धावा केल्या असल्या तरी त्याचा हा अगदीच एकाकी प्रतिकार ठरला. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरने 3 बळी टिपत लखनौच्या डावाला खरा सुरुंग लावला.
तत्पूर्वी, लखनौच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मार्यामुळे राजस्थान रॉयल्सचा डाव अवघ्या 159 धावांवर मर्यादित राहिला. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याला मोहसीन खानने दिलेल्या उत्कृष्ट साथीच्या जोरावर लखनौच्या संपूर्ण भारतीय गोलंदाजी फळीने राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
मोहम्मद शमीने 30 धावा देत 2 महत्त्वाचे बळी टिपले. दुसर्या बाजूने उंचापुर्या मोहसीन खानने 4 षटकांत 17 धावांत 2 फलंदाजांना तंबूत धाडले. या दोघांनी मिळून राजस्थानच्या पहिल्या चार सर्वोत्तम फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शमीने लागोपाठच्या दोन चेंडूंवर फॉर्मात असलेल्या यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव ज्युरेलला बाद केले, तर मोहसीनने दोन वेगवेगळ्या स्पेलमध्ये वैभव सूर्यवंशी आणि शिमरॉन हेटमायरची शिकार केली.
लखनौच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांवर निर्धाव चेंडूंचा प्रचंड दबाव टाकला. शमीने 15, मोहसीनने 11 तर प्रिन्सने 13 चेंडू निर्धाव टाकत राजस्थानची धावसंख्या रोखून धरली. रवींद्र जडेजाने 29 चेंडूंत नाबाद 43 धावा केल्याने राजस्थानला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला.
निर्धाव षटकात वैभव सूर्यवंशी ठरला मोहसीनचे सावज
मोहसीन खानने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला जाळ्यात ओढण्यासाठी उत्कृष्ट रणनीती आखली. त्याने सलग 5 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर शेवटचा चेंडू वेगवान लेग-कटर टाकला. यावर फटका मारण्याच्या नादात सूर्यवंशीचा अंदाज चुकला आणि दिग्वेश राठीने मागे धावत जात सुरेख झेल टिपला. येथेच सूर्यवंशीची खेळी संपुष्टात आली.