नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर आता त्यांना कोविडनंतरच्या गुंतागुंतीच्या आजाराचा त्रास सुरू झाला आहे. त्यांना श्वासोच्छवासाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
या संदर्भात आज (दि.१७) काँग्रेसच्या सरचिटणीसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना १२ जून रोजी दुपारी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोविड संसर्गानंतर त्यांच्या नाकातून रक्त येत होते. खूप रक्तस्त्राव होत होता. त्यांच्या श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्ग झाला आहे. सध्या त्यांच्यावर कोविड नंतरच्या इतर लक्षणांवर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली असून त्या देखरेखीखाली आहेत.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी २३ जून रोजी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची दोन दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. याविरोधात देशभरात काँग्रेस नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. केंद्र सरकारच्याविरोधात काँग्रेसने रान पेटविण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचलंत का ?