डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम एक महिन्यासाठी तुरुंगातून सुटला | पुढारी

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम एक महिन्यासाठी तुरुंगातून सुटला

चंदीगड; पुढारी ऑनलाईन : बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम (Rape convict Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim) याला आज रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून एका महिन्यासाठी पॅरोल मिळाला. तो आज सकाळी ७.३० वाजता सुनारिया तुरुंगातून बाहेर पडला आणि थेट उत्तर प्रदेशातील बागपत येथील बरनावा मधील डेरा सच्चा सौदाच्या आश्रमाच्या दिशेने रवाना झाला. दोन महिला शिष्यांवरील बलात्कार प्रकरणी गुरमीत राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २०१७ मध्ये दोषी ठरवले होते. तो रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

याआधी त्याला २१ दिवसांचा पॅरोल मिळाला होता. आता पुन्हा त्याला एका महिन्यासाठी पॅरोल मिळाला आहे. गुरमीत तुरुंगातून सुटल्यानंतर उत्तर प्रदेशातील बागपत येथील आश्रमात गेला आहे. यामुळे डेराच्या आजूबाजूच्या भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
रोहतक तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीम याला एक महिन्याचा पॅरोल मिळाल्याने तो आज शुक्रवारी तुरुंगातून बाहेर गेला. पॅरोल अर्जात त्याने बागपत येथील बरनावा आश्रमात राहणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर हरियाणा शासनाने बागपत पोलिसांकडून अहवाल मागवला होता. त्यानंतर त्याला पॅरोल मंजूर झाला होता.

डेरा प्रमुखाला २००२ मधील डेरा प्रबंधक रंजीत सिंह याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अन्य चारजणांसह दोषी ठरविण्यात आले होते. २०१९ मध्ये त्याला आणि अन्य तिघांना एक पत्रकाराच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

 

 

Back to top button