हिराबेन यांचा उद्या शंभरावा वाढदिवस; पंतप्रधान मोदी देणार खास गिफ्ट | पुढारी

हिराबेन यांचा उद्या शंभरावा वाढदिवस; पंतप्रधान मोदी देणार खास गिफ्ट

गांधीनगर:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचा यंदा शंभरावा वाढदिवस आहे. 18 जून रोजी पंतप्रधान मोदी गुजरात दौर्‍यावर असून ते वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. ते या दिवशी आईची भेट घेणार असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.

गांधीनगर येथील घरी हिराबेन यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई आपल्या धाकट्या मुलासोबत गांधीनगर शहराच्या बाहेरील रायसन गावात राहतात. तिथेच त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. तसेच वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हाटकेश्‍वर मंदिरात पूजेचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त हिराबेन यांना पंतप्रधान मोदींकडून खास गिफ्ट मिळणार आहे. हिराबेन यांच्या शताब्दी वर्षानिमित्त गांधीनगर येथील एका रस्त्याला हिराबेन यांचे नाव दिले जाणार आहे, अशी माहिती गांधीनगरच्या महापौरांनी दिली आहे.

हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त रायसन पेट्रोल पंपाजवळील 80 मीटर रस्त्याला पूज्य हिराबेन मार्ग असे नाव दिले जाईल. त्यांचे नाव येणार्‍या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हाच यामागचा उद्देश आहे, असे गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह इतर नामवंत कलाकारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Back to top button