मनोरंजन

‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे मराठी चित्रपटात दिसणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज बऱ्याच अमराठी कलाकारांना मराठीची गोडी लागली असून, त्यांची पावलं मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने वळत आहेत. काही कलाकार चांगल्या संधीद्वारे मराठीत पदार्पण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 'सुर्या' या आगामी मराठी चित्रपटाच्या रूपात चालून आलेल्या संधीचं मराठमोळे अभिनेते हेमंत बिर्जे यांनी सोनं केलं आहे. नायक बनून सिनेसृष्टीत दाखल झालेल्या हेमंत यांनी 'नायक नहीं खलनायक हूं मैं…'चा सूर आळवत मराठी सिनेसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेतून पदार्पण केलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तूत एस. पी. मोशन पिक्चर्सच्या या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली आहे. येत्या ६ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सुर्या'चं दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांनी केलं आहे.

८० च्या दशकात गाजलेल्या 'टारझन' चित्रपटात अविस्मरणीय टायटल रोल साकारणाऱ्या हेमंत बिर्जे यांनी 'सूर्या' चित्रपटाद्वारे केलेला मराठीपर्यंतचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ते म्हणाले की, मी महाराष्ट्रीय असून, पुण्यात वाढलो असलो तरी कधी मराठी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही. २० वर्षांपूर्वी अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी मराठी चित्रपटात काम करण्यासाठी विचारलं होतं, पण त्यावेळी शक्य झालं नाही. आता 'सूर्या'' चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

खरं तर मला गावाकडच्या भूमिका साकारायच्या नव्हत्या. शहरातील व्यक्तिरेखा मी अधिक सक्षमपणे साकारू शकतो याची खात्री होती. त्यामुळे मराठीत येण्यासाठी योग्य संधीच्या प्रतीक्षेत होतो. 'सूर्या'च्या निर्माता-दिग्दर्शकांनी जेव्हा माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मला कथा आणि त्यातील कॅरेक्टर खूप आवडल्यानं होकार दिला. यात मी खलनायक साकारला असून, डॉन बनलो आहे. हा खूप खतरनाक असला तरी जास्त बोलत नाही. इथे धंदा करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील आणि पैसे द्यायचे नसतील तर मरायला तयार रहा, हा त्याचा डायलॉग आहे. हा चित्रपट तेलुगू शैलीत बनवला आहे. यातील अॅक्शन, अभिनय, नृत्य, दिग्दर्शन, गीत-संगीत, कॅमेरावर्क सारं काही आजवरच्या मराठी चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे.

'सुर्या' चित्रपटात प्रसाद मंगेश, रुचिता जाधव, देवशी खंडुरी हे युवा चेहरे दिसणार आहेत. याखेरीज उदय टिकेकर, अखिलेंद्र मिश्रा, गणेश यादव, संदेश जाधव, पंकज विष्णू, हॅरी जोश, अरुण नलावडे, संजीवनी जाधव, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. मंगेश ठाणगे यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून, मंगेश यांनी विजय कदम यांच्यासोबत पटकथालेखनही केलं आहे.

राष्ट्रीय पारितोषिक विजेते डिओपी मधु. एस. राव यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, राहुल भातणकर यांनी संकलन केलं आहे. या चित्रपटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेली धडाकेबाज अॅक्शनदृश्ये फाईट मास्टर अब्बास अली मोघल आणि कौशल-मोझेस यांनी दिग्दर्शित केली आहेत. संग्राम शिर्के या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

SCROLL FOR NEXT