पुणे : चंद्रकांत पाटलांच्या घराबाहेर व्हिडिओ काढणारा अटकेत | पुढारी

पुणे : चंद्रकांत पाटलांच्या घराबाहेर व्हिडिओ काढणारा अटकेत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. असे असतानाही पाटील यांच्या कोथरूड भागातील महात्मा सोसायटीतील देवशिष बंगल्याबाहेर थांबून महिलेसह दोघांनी आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार केली. याबाबत सुरक्षा रक्षकाने हटकल्यानंतर सुरक्षा रक्षकाला उद्धट बोलून ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी आता एकाला अटक करण्यात आली आहे.

संदीप कुदळे (रा. पुणे) अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात दोन, वारजे पोलिस ठाण्यात एक, असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना दहा डिसेंबर रोजी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. कोथरूड पोलिस ठाण्यात याप्रकरणी पोलिस हवालदार सचिन मधुकर सोनवणे यांनी आरोपी संदीप कुदळे व अनोळखी महिलेविरोधात फिर्याद दिली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील बंगल्यावर सोनवणे हे गार्ड ड्युटी करीत होते. या वेळी रात्री बाराच्या सुमारास एक महिला आणि संदीप कुदळे यांनी व्हिडिओ क्लिप तयार केली. या वेळी दोघांना हटकल्यानंतर त्यांनी वाद घालत ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.

संदीप कुदळेवर दुसरा गुन्हा
संदीप कुदळे याच्यावर दुसरा गुन्हा वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल असून, त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील बबनराव हिंगणे (वय 45) यांनी तक्रार दाखल केली आहे. संदीप कुदळे याने फेसबुक पोस्ट व व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून सदर फेसबुक पोस्टमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबरोबरच टि्वटरच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांना मानणार्‍या समाजाच्या भावना भडकवल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button