पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक नात्याचा एक राखीव कोपरा असतो. यात एक ख़ास कोपरा मैत्रीचाही असतो. आपल्या सुख दु:खात सदैव आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे मित्र… आयुष्याच्या चढउतारात मन हलकं करायला मैत्रीचं नातं हवं असतं. म्हणून आपल्याभोवती मैत्रीचा दरवळ असेपर्यंतच, आपल्या मनातल्या मैत्रीच्या या कोपऱ्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे त्यांना व्यक्त करून सांगणं गरजेचं असतं. हाच आशय 'रूप नगर के चीते' या आगामी मराठी चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे.
एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी 'रूप नगर के चीते' या भव्य मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा असलेल्या 'रूप नगर के चीते' या चित्रपटाचं आकर्षक पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. १६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
एकमेकांच्या खांद्यावर आत्मविश्वासाने हात टाकून, आपल्याच मस्तीत चाललेले दोन तरुण मित्र या पोस्टरमध्ये दिसत आहेत. चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची चर्चा होती. त्यामुळे या चित्रपटात कोण असणार? याचे तर्क-वितर्क लावले जात होते. आता याचा खुलासा झाला असून करण किशोर परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा अभिनेते या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
मैत्रीला प्रेमाचा, आपुलकीचा, मस्तीचा आणि हक्काचा असा वेगवेगळा रंग असतो. या सगळ्या रंगाचं अद्भुत इंद्रधनुष्य 'रूप नगर के चीते' या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.
'रूप नगर के चीते' या चित्रपटाचे लेखन विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी केले असून छायांकन संतोष रेड्डी तर संकलन गोरक्षनाथ खांडे यांचे आहे. गीते जय अत्रे यांची आहेत. सुप्रसिद्ध मल्याळम संगीतकार शान रेहमान आणि मनन शाह यांनी संगीत तर पार्श्वसंगीताची जबाबदारी मुजीब माजीद यांनी सांभाळली आहे.
हेड ऑफ़ प्रोडक्शन मालविका शाह आहेत. महावीर सबनवार यांनी साऊंड डिझायनिंगची तर प्रशांत बिडकर यांनी प्रोडक्शन डिझायनिंगची जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषा विहान सूर्यवंशी, सागर तिर्लोतकर यांची आहे. रंगभूषा महेश बराटे यांची आहे. नृत्यदिग्दर्शन स्टेनली डी कोस्टा, विहान सूर्यवंशी, संतोष रेड्डी यांचे आहे. रोहन मापुस्कर चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर आहेत.