शिरूर : कंपनीत चोरी; मदत करणारे अखेर जेरबंद | पुढारी

शिरूर : कंपनीत चोरी; मदत करणारे अखेर जेरबंद

शिरूर; पुढारी वृत्तसेवा: रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत कंपनीत चोरी करून 9 लाख 92 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेणार्‍या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसीमध्ये डॉगकॉग कपंनीत अज्ञात आरोपींनी कंपनीच्या सरंक्षक भिंतीवरून चढून कंपनीत प्रवेश कला. या वेळी टूल रूममधील मशीनचे 9 लाख 92 हजार 625 रुपयांचे भाग चोरून नेले होते. या बाबत व्यवस्थापक मंगेश नारायण देशमुख यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा पोलिस तपास करत होते.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी रोशन अशोकराव मेश्राम (रा. वर्धा) व त्यास मदत करणारा आरोपी संजय रामकिसन तोतरे (रा. रांजणगाव) यांना तसेच या गुन्ह्यातील चोरीचा माल जवळ बाळगणारे त्यांचे मित्र रूपेश देवानंद गुरूतकर (रा. रांजणगाव) व कैलास अंगत मुंडे (रा. चिखली पाटील, नगर) यांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात चोरून नेलेला 8 लाख 6 हजार 999 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा तपास रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विजय सरजिने, संतोष औटी, विलास आंबेकर, पोलिस अंमलदार विजय शिंदे, उमेश कुतवळ यांचे पथकाने केला.

Back to top button