औरंगाबाद : बालेकिल्ल्यातच शिवसेनेला भगदाड | पुढारी

औरंगाबाद : बालेकिल्ल्यातच शिवसेनेला भगदाड

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या औरंगाबाद जिल्ह्यातच शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ आता पक्षसंघटनेतही फूट पडली आहे. पाचही आमदारांसोबत सेनेतील अनेक पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

औरंगाबाद महापालिका हद्दीतील आमदार संजय शिरसाट आणि आमदार प्रदीप जैस्वाल हे दोन आमदार शिंदे गटात गेले. त्यांच्यासोबत माजी महापौर विकास जैन, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, सिद्धांत शिरसाट हेदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. तसेच शहरातील आणखी 12 नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.

शिवसेनेला सर्वाधिक फटका पैठण तालुक्यात बसला आहे. तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, जिल्हा दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भुमरे, उपसभापती अशोक भवर, खरेदी- विक्री संघाचे चेअरमन बाबूराव पडूळ, नगरपरिषदेतील बहुसंख्य पदाधिकारी शिवसेना सोडून आमदार संदीपान भुमरे यांच्यासोबत गेले आहेत. पैठण शहर आणि तालुक्यात 75 टक्क्यांहून अधिक पदाधिकारी सेनेतून बाहेर पडले आहेत.

वैजापूर तालुक्यात सेनेचे लोकप्रतिनिधी आपल्यासोबत नेण्यात बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांना यश आले आहे. सेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र साळुंके, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांच्यासह वैजापूर नगरपरिषदेतील शिवसेनेचे 11 पैकी 10 नगरसेवक बोरनारे यांच्याकडे गेले आहेत. सिल्लोड तालुक्यात आधी शिवसेनेची फारशी ताकद नव्हती; परंतु विधानसभा निवडणुकीवेळी आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेत दाखल झाल्याने सेनेचे बळ वाढले होते; परंतु आता सत्तार यांनीच बंडखोरी केल्याने सेनेचे जवळपास सर्वच पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत बाहेर पडले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, सिल्लोडच्या नगराध्यक्ष राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, 29 नगरसेवक, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, सोयगावचे तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, सोयगाव नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक यांच्यासह असंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत.

हिंगोलीतही मोठे भगदाड पडणार

हिंगोली : आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर शिवसेनेला जिल्ह्यात मोठा हादरा बसला आहे. आ. बांगर यांच्या शिंदे गटात जाण्याने शिवसैनिक जरी सध्या ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असले तरी भविष्यात मात्र शिवसेनेत उभी फू ट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिंगोलीचे खा. हेमंत पाटील हे शिंदे गटात गेल्याने हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेत उभी फूट पडली आहे.

आ. बांगर हे आपल्या काही मोजक्या समर्थकांसह शिंदे गटात दाखल झाले. त्यांच्यासोबत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, औंढ्याचे नगराध्यक्ष खंदारे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती फुकिरा मुंढे यांचाही समावेश आहे. त्यामुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. सध्या तरी शिवसेनेतील मोजकेच पदाधिकारी आ. बांगर यांच्यासोबत आहेत. उपजिल्हाप्रमुख, चार तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी मात्र सध्यातरी शिवसेनेत आहेत. सोमवारी खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात दाखल होणार असल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली. आ. बांगर यांच्या शिंदे गटात जाण्याने शिवसेनेला काही अंशी हादरा बसला असताना आता खासदार पाटील हे शिंदे गटात दाखल होणार असल्याच्या चर्चेने शिवसेनेला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्यातरी सर्वसामान्य शिवसैनिक व पदाधिकारी हे ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबादेत दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला

उस्मानाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार विजयी झाले, तर 2009 चा अपवाद वगळता 1998 पासून येथून शिवसेनेचा खासदार विजयी होत आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेतील बंडाळीत जिल्ह्याचे दोन आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, उमरगा या दोन विधानसभा मतदारसंघांतील शिवसैनिक सध्या संभ्रमात आहे. परंड्याचे आ. तानाजी सावंत व उमरग्याचे आ. ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटात पहिल्या दिवसापासून दाखल झाले आहेत. परंडा मतदारसंघात भूम, परंडा व वाशी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तिन्ही तालुक्यांतील मूळ शिवसेनेचा कार्यकर्ता पक्षासोबत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. तर उमरगा व लोहारा या दोन्ही तालुक्यांवर माजी खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांचे वर्चस्व आहे. आजही प्रा. गायकवाड यांची नेमकी चाल काय, हे लक्षात येत नाही. प्रा. गायकवाड यांच्या आशीर्वादानेच आपण शिंदेंसोबत गेल्याचे आ. चौगुले जाहीरपणे सांगत आहेत, तर मी उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे प्रा. गायकवाड सांगत आहेत. त्यामुळे उमरगा विधानसभा मतदारसंघात संभ्रम आहे. उस्मानाबादचे आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील हे मात्र पक्षासोबत आहेत. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या साथीने ते पक्षाची मोट नव्याने बांधत आहेत. युवा सेनेचे राज्य विस्तारक सूरज साळुंके यांच्यासह काही मोजकेच पदाधिकारी सध्या तरी शिंदे गटात गेल्याचे चित्र आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरही बर्‍याच घडामोडी अपेक्षित आहेत.

आमदार कल्याणकरांचा अपवाद वगळता नांदेडचे सर्व पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबत

नांदेड : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर नांदेडमधील शिवसेनेत फूट पडली असून, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बालाजी कल्याणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. एकटे आ. कल्याणकर शिंदे गटात असून, जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी ‘मातोश्री’च्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले असल्याची परिस्थिती जिल्ह्यात दिसून येते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी काळात नांदेड दौर्‍यावर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात मागील महिन्यात झालेल्या राजकीय घडामोडींदरम्यान मुंबई-सुरत-गुवाहाटी असा प्रवास करत आ. कल्याणकर हे शिंदे गटाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे नांदेडमधील शिवसेनेचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन केले होते. आ. कल्याणकर यांच्यासोबत शिवसेनेचा एकही प्रमुख पदाधिकारी आजघडीला शिंदे गटात सहभागी झालेला नसून आगामी काळात काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व नुकतेच बीड जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविलेले धोंडू पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर, माजी आ. अनुसया खेडकर, डॉ. मनोजराज भंडारी, युवासेनेचे माधव पावडे, महेश खेडकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटन बांधणीसाठी कामाला लागले आहेत.

Back to top button