Kantara Chapter 1 to Stream in Hindi on Prime Video: बहुप्रतिक्षित ‘कांतारा चॅप्टर 1’ अखेर हिंदीत OTT वर रिलीज होत आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित हा भव्य चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट हिंदी प्रेक्षकांसाठी OTTवर रिलीज होत आहे.
कन्नडसह तमिळ, तेलुगू आणि मल्याळममध्ये हा चित्रपट दोन आठवड्यांपूर्वीच OTTवर आला होता. मात्र हिंदीत तो आला नव्हता. आता Prime Video ने सांगितले आहे की, हिंदी व्हर्जन 27 नोव्हेंबर 2025 रोजी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.
‘कांतारा चॅप्टर 1’ हा 2022 च्या सुपरहिट ‘कांतारा’चा प्रीक्वेल असून, हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ₹125 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांना इतका भावला की या चित्रपटाने फक्त 41 दिवसांत भारतात ₹618.73 कोटी, तर जागतिक स्तरावर तब्बल ₹848.15 कोटींची विक्रमी कमाई केली. विकी कौशलच्या ‘छावा’लाही मागे टाकत हा 2025 चा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.
चित्रपट Prime Video वर आधीच रिलिज झाला असला तरी हिंदी व्हर्जन थांबण्याचे कारण म्हणजे OTT ची 8 आठवड्यांची विंडो. सिनेमागृहांतील रिलीजनंतर साधारण दोन महिने पूर्ण झाल्यावरच हिंदी डब करण्याचा नियम आहे. सुरुवातीला असा अंदाज होता की निर्मात्यांनी वेगळ्या OTT प्लॅटफॉर्मशी करार केला आहे; परंतु हिंदी रिलीजसुद्धा Prime Video वरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘कांतारा चॅप्टर 1’ मध्ये कथा मूळ चित्रपटापूर्वीच्या काळात जाते. कदंब राजवंशाचा शासनकाल, दैव कोला परंपरेची सुरुवात, तिच्यामागील अध्यात्मिक श्रद्धा आणि राजसत्तेच्या क्रूरतेविरुद्ध उभे राहिलेले लोक, हे सगळे चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.
चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य भूमिका ऋषभ शेट्टी यांनी साकारली आहे. त्यांच्यासोबत रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया, हरिप्रशांत, प्रमोद शेट्टी, दीपक राय पनाजे, माइम रामदास आणि इतर दमदार कलाकार आहेत. संगीत अजनीश लोकनाथ यांनी दिले आहे.