Marathi Reel Star Prathamesh Kadam Passes Away: सोशल मीडियावर आपल्या साधेपणामुळे आणि धमाल रिल्समुळे ओळख निर्माण करणारा तरुण इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचं निधन झालं आहे. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात असून, प्रथमेशच्या चाहत्यांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपासून प्रथमेशची प्रकृती ठीक नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. प्रथमेशच्या निधनाची माहिती त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावरून शेअर केली.
प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांच्या रिल्सना नेटकऱ्यांकडून नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळायचा. त्याच्या व्हिडिओंमध्ये एक वेगळाच जिव्हाळा असायचा. म्हणूनच त्यांची जोडी सोशल मीडियावर चर्चेत असायची. इतकंच नाही तर अनेक मराठी कलाकारांनी देखील या माय-लेकाच्या रिल्सचे कौतुक केलं होतं.
काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर घराची जबाबदारी प्रथमेशवर आली. मात्र त्याने ते सगळं शांतपणे हाताळलं. स्वतःच्या दुःखावर मात करत त्याने आईलाही धीर दिला आणि आयुष्य पुढे नेलं. या सगळ्यातूनही दोघं मिळून रिल्सही करत होते.
प्रथमेशचा मित्र तन्मय पाटेकर याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत भावनिक शब्दांत निरोप दिला. त्याने लिहिलं की प्रथमेश कायम आठवणीत राहील आणि त्याची उणीव खूप जाणवेल. प्रथमेशच्या निधनाचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या अचानक जाण्यामुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
आधी पतीचं आणि आता मुलाचं छत्र हरवल्याने प्रथमेशच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रथमेशचे मित्र, चाहते आणि ओळखीचे लोक या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत.