

पुणे: पुणे जिल्ह्याच्या पोलीस दलाने देशपातळीवर ठसा उमटवला आहे. पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या उल्लेखनीय, कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसध्येला केंद्रीयगृह मंत्रालयाच्या वतीने पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली.
भोर तालुक्यातील तांबड, गुंजन मावळ हे त्यांचे मूळ गाव. गावातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. सन १९९३ मध्ये दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले. मुंबईतील येलो गेट, वडाळा, एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर मुंबई शहर, सातारा, नागपूर शहर गुन्हे शाखा, अहिल्यानगर विशेष शाखा आणि सध्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत अशी विविध ठिकाणी त्यांनी प्रभावी सेवा बजावली. त्यांचा एकूण सेवा कालावधी तब्बल ३२ वर्षांचा आहे. सेवा काळात त्यांनी अनेक कुख्यात गुन्हेगार टोळ्यांना जेरबंद करत मोठी कामगिरी बजावली.
पुणे ग्रामीणमध्ये कार्यरत असताना ऊरुळी कांचन परिसरातील कुख्यात आप्पा लोंढे टोळीवर कारवाई करून परिसरातील गुन्हेगारीला आळा घातला. नागपूर शहरात कार्यरत असताना खून, दरोडा, खंडणीसह ३८ गंभीर गुन्हे उघडकीस आणत कुख्यात राजा गौस टोळीचा पर्दाफाश केला. तसेच संतोष आंबेकर टोळीवर कारवाई करून नागपूर शहरातील दहशत संपुष्टात आणण्यात मोलाचा वाटा उचलला.
अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जनावरांच्या व शेतीमाल चोरीच्या गुन्ह्यांत स्वतः मैदानात उतरून सराईत टोळ्यांचा छडा लावला आणि चोरीचा मुद्देमाल शेतकऱ्यांना परत मिळवून दिला. कोरोना महामारीच्या काळात पुणे ग्रामीण व अहिल्यानगरमध्ये कार्यरत असताना स्थलांतरित मजुरांसाठी उपाययोजना, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शिळीमकर नोव्हेंबर २०२२ पासून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, आंतरराज्यीय गुन्हेगार टोळ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
यवत येथील एका कुटुंबाच्या सात जणांच्या मृत्यूचा गुन्हा आत्महत्येऐवजी खून असल्याचे सिद्ध करणे, सासवड तहसील कार्यालयातील ईव्हीएम चोरीचा छडा लावणे, तसेच हायवेवरील लुटमार करणाऱ्या टोळ्यांना जेरबंद करणे ही त्यांची ठळक कामगिरी आहे.अवैध अग्निशस्त्र, अमली पदार्थ जप्ती, मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाई, दंगल नियंत्रण, निवडणूक काळातील बंदोबस्त आदी सर्वच बाबींमध्ये त्यांनी प्रभावी नेतृत्व दाखवले. त्यांच्या या उत्कृष्ठ सेवेसाठी यापूर्वी २०२४ मध्ये पोलीस महासंचालक पदकानेही त्यांचा सन्मान झाला आहे. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व शिस्तप्रिय स्वभावामुळे अविनाश शिळीमकर हे पोलीस दलातील आदर्श अधिकारी म्हणून ओळखले निर्माण केली आहे. राष्ट्रपती पदकामुळे पुणे जिल्ह्याला पुन्हा एकदा गौरव प्राप्त झाला आहे.