

Young candidates are effectively using social media for campaigning
सुनील मरकड
खुलताबाद : सतरंज्या उचलून निवडणूक जिंकण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत, अशी चर्चा सध्या तालुकाभर रंगू लागली आहे. तब्बल आठ वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीने संपूर्ण राजकीय वातावरण तापले असून, यावेळी चित्र काहीसे वेगळे आणि धक्कादायक ठरत आहे. उमेदवार जरी गोंधळलेल्या अवस्थेत, संभ्रमात आणि कधी कधी मकोमातफ असल्यासारखे वाटत आहे, तरी कार्यकर्ते मात्र प्रचंड वेगाने, आक्रमक आणि सुसाट प्रचारात उतरले आहेत.
आठ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आठ वर्षांपासून रखडल्या होत्या. अनेकांनी या निवडणुकीसाठी वर्षानुवर्षे तयारी केली, मतदारांशी संबंध दृढ केले, सामाजिक कामे वाढवली; मात्र उमेदवारी जाहीर होताच अनेकांची स्वप्ने एका क्षणात धुळीस मिळाल्याचे चित्र दिसून आले. निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवताना अनेक उमेदवार अजूनही संभ्रमात आहेत.
कोणता मुद्दा पुढे न्यावा, कोणत्या मतदारसमूहावर भर द्यावा, प्रचाराची दिशा काय असावी यावर स्पष्टता नसल्याचे दिसते. काही ठिकाणी उमेदवार मागे, कार्यकर्ते पुढे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कार्यकर्ते मात्र सोशल मीडियावर प्रचार, घराघरांत संपर्क, बैठका, वाहनफेऱ्या, बॅनर पोस्टर यामध्ये आघाडीवर आहेत.
नेता येईल न येईल, पण आम्ही लढू, अशा आवेशात कार्यकर्ते काम करत असल्याचे चित्र आहे. तरुण उमेदवारांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्याने प्रचाराची पद्धतच बदलली आहे. व्हिडिओ, लाईव्ह संवाद, व्हॉट्सअॅप ग्रुप्स, फेसबुक पोस्ट्स यामुळे मतदारांपर्यंत थेट पोहोच साधली जात आहे. पारंपरिक प्रचार पद्धतींवर अवलंबून असलेले काही उमेदवार मागे पडत आहेत.