Mamta Kulkarni reaction on kinnar akhada
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या होत्या. आणि त्यानंतर ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी आखाड्यातून काढून टाकले. आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही पदावरून हटवण्यात आले. ममता कुलकर्णी यांच्या वादग्रस्त भूतकाळातील महामंडलेश्वर म्हणून नियुक्तीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. लक्ष्मीने संस्थापकांच्या संमतीशिवाय कुलकर्णी यांची नियुक्ती केल्याचा आरोप करत दोघींवर ही कारवाई करण्यात आली होती. आता तीन महिन्यांनंतर या गोष्टीवर ममता कुलकर्णीने मौन सोडले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना ती म्हणाली, "...१४० वर्षांमध्ये इतका पवित्र प्रसंग असलेल्या त्या कुंभात महामंडलेश्वर होणे हे सर्व देवाच्या हातात होते. माझ्या २५ वर्षांच्या 'तपस्येचे' फळ देवाने मला दिले. म्हणून, ते घडले."
प्रयागराजमधील संगम तटावर पिंडदान केल्यानंतर तिला साध्वी यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखले जाईल, असे म्हटले गेले. महाकुंभ २०२५ मध्ये पिंडदान करून किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर त्या बनल्या होत्या. त्यावेळचे पट्टाभिषेकचे फोटोदेखील समोर आले होते. जानेवारीमध्ये, किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी घोषणा केली होती की, ममता कुलकर्णीनी महामंडलेश्वर म्हणून आध्यात्मिक भूमिका स्वीकारली आहे.
ऋषी दास यांनी ३० जानेवारीला एका प्रेस रिलीज मध्ये म्हटलं होतं- किन्नर आखाड्याचा संस्थापक असल्याच्या नात्याने मी घोषणा करतो की, आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना तत्काळ त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांची नियुक्ती धार्मिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ट्रान्सजेंडर समुदायाच्या उन्नतीसाठी करण्यात आली होती, परंतु त्या या जबाबदाऱ्यांपासून दूर गेल्या. दास म्हणाले की, ममता कुलकर्णी यांची नियुक्ती ही चिंतेची बाब आहे कारण त्यांचा गुन्हेगारी इतिहास आहे.
ममता कुलकर्णीने सांगितलं की, राजकारणात येण्याचे तिचा कोणताही प्लॅन नाही. 'कल्कि विष्णु जीचे १० वे अवतार मानले जातात. मला एका शिलान्यासासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. मी २५ वर्षे ध्यान आणि तप केलं आहे. आणि या पुण्य कर्मासाठी माझी निवड झाली. सनातन धर्माचा प्रचार-प्रसारचं मला पुढे करत राहायचं आहे.'
बॉलीवूडची एकेकाळची टॉपची अभिनेत्री म्हणून ममताचे नाव घेतलं जातं. करण अर्जुन सारख्या सुपरहिट चित्रपटासाठी ती ओळखली जाते. यामध्ये तिने सलमान खान - शाहरुख खान सोबत काम केलं होतं. २००० मध्ये तिने चित्रपट इंडस्ट्री सोडली होती आणि परदेशात गेली होती. त्यानंतर आता ती भारतात परतलीय.