

अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला असून महाकुंभ मेळ्यामध्ये तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले. मात्र वादानंतर तिला या पदावरून हटविण्यातही आले. ममताची अभिनयापेक्षा अंडरवर्ल्डशी असणार्या संबंधांची चर्चा अधिक झाली होती. ग्लॅमर, झगमगाटाच्या मोहापायी आयुष्य कसे भरकटत जाते याची करुण कहाणी म्हणून ममताच्या प्रवासाकडे पाहिले जाते.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये उसळलेली अलोट गर्दी, अलीकडेच झालेली चेंगराचेंगरी, तेथील साधू-महंतांच्या परंपरा, नागा साधू यांच्या चर्चांनी गेले काही दिवस अवघा देश गजबजून गेला आहे. या सर्व चर्चांना कलाटणी देणारी एक घटना मध्यंतरी घडली. ती म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये हिंदी चित्रपटांमधून झळकलेली बोल्ड नायिका ममता कुलकर्णी हिने या कुंभमेळ्याला उपस्थिती लावली आणि थेट संन्यास पत्करण्याचा निर्णय जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. इतकेच नव्हे तर या महाकुंभात तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले होते. तिचे नावही बदलण्यात आले. तिचे नवीन नाव यमाई ममता नंद गिरी असे केले. ममताने प्रयागराजमध्ये पिंड दानही केले. चित्रपट कारकिर्दीपासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत, अनेक वाद-विवादांनी भरलेल्या तिच्या प्रवासाला मिळालेली ही कलाटणी अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारी ठरली.
वयाच्या विसाव्या वर्षी ‘तिरंगा’ चित्रपटातून आपल्या हिंदी सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात करणारी ममता त्या काळातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिने ननबर्गल या तमिळ चित्रपटात काम केले होते. हिंदी सिनेसृष्टीत ‘करण अर्जुन’, ‘बाजी’, ‘वक्त हमारा है’, ‘वादे इरादे’, ‘आशिक आवारा’, ‘क्रांतिवीर’, ‘छुपा रुस्तम’, ‘नसीब’, ‘किला’, ‘बेकाबू’, ‘जीवन युद्ध’, ‘चायना गेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असतानाच अंडरवर्ल्डचा गँगस्टर छोटा राजनशी तिचे नाव जोडले गेले. असं म्हटलं जातं की, ममता कुलकर्णी अंडरवर्ल्ड गँगचा डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस असलेल्या छोटा राजनसोबतही रिलेशनमध्ये होती. पण नंतर छोटा राजनने भारत सोडला. मग त्यांचे अफेअरही संपुष्टात आले. ममताला चित्रपटातून बाहेर फेकण्यात आले होते. पण छोटा राजनच्या सांगण्यावरून तिला पुन्हा चित्रपटात कास्ट करण्यात आले. याबाबतचे गूढ आजही कायम आहे. परंतु छोटा राजननंतर ड्रग्जच्या जगात नंबर वन खेळाडू म्हणून ओळखल्या जाणार्या विकी गोस्वामीसोबत ममता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. विकीला ड्रग्जच्या गुन्ह्यात पोलिसांनी पकडले तेव्हा ममतानेच त्याचा हॉटेल व्यवसाय ताब्यात घेतला आणि आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला तुरुंगातून बाहेर काढले. 2013 मध्ये दोघांनी लग्न केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. तुरुंगातच मुस्लिम रीतिरिवाजांनुसार दोघांनी लग्न केले. यामुळे तिची सिने कारकीर्द संपुष्टात आली. मध्यंतरी ती भारतात परतली आणि आता थेट महामंडलेश्वर बनून संन्यासी झाली. वादानंतर तिला या पदावरून हटविण्यात आले.
ट्रान्सजेंडर कथावाचक जगद्गुरू हिमांगी सखी माँ यांनी देखील यावर भाष्य करत याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. हिमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीच्या भूतकाळातील वादांवर मुद्दा उचलत तिच्या नियुक्तीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. किन्नर आखाड्यात येणं ममताने फक्त प्रसिद्धीसाठी केलं आहे. समाजाला तिचा भूतकाळ चांगलाच माहिती आहे. तिला ड्रग्ज प्रकरणात जेलमध्येही जावं लागलं होतं. आता अचानक ती भारतात येते, महाकुंभमध्ये सहभागी होते आणि महामंडलेश्वर पद तिला दिलं जातं. हे योग्य नसून त्याची चौकशी व्हायला हवी, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज योगिनी म्हणून ममता कुलकर्णीने स्वतःची नवी ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असला तरी तिचा भूतकाळ विसरला जाणार नाही. अनेकांना आठवत असेल, एका लोकप्रिय मासिकाच्या व्यवस्थापनाने आपल्या मुखपृष्ठावर नवीन चेहर्याला संधी घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना प्रस्थापित अभिनेत्री नको होती; पण तरीही तिचे छायाचित्र खळबळ उडवून देणारे असावे, अशी अट छायाचित्रकाराला घालण्यात आली होती. यासाठी अनेकींचा शोध घेतला गेला. अखेरीस या शूटसाठी ममताशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. बॉलीवूडबाबत असणार्या आकर्षणामुळे ममताने मासिकासाठी फोटोशूट करण्यास तयारी दर्शवली. यासाठी तिने काही अटी घातल्या होत्या. मासिकाच्या व्यवस्थापनाने त्याला सहमती दर्शवली आणि टॉपलेस पोज देऊन ममताने सर्वत्र खळबळ उडवून दिली. आज ममता कुलकर्णी अध्यात्माच्या मार्गावर निघाली असली तरी एकेकाळी तिने स्वतःला आयेशा बेगम असे नाव देत लोकांची दिशाभूल केली होती, हाही इतिहास विसरता येणार नाही. विकी गोस्वामीने जेव्हा आपले नाव बदलून युसूफ खान ठेवले तेव्हा ममताने आपले नाव आयेशा बेगम असे ठेवले होते. या दोघांनीही तुरुंगात इस्लामिक रीतिरिवाज आणि परंपरेनुसार लग्न केल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. पण दोघांनीही ते लग्न नाकारले. केनिया पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आणि ड्रग्ज तस्करी प्रकरणात तिचा कोणताही संबंध नसल्याचे आढळल्यानंतर तिला सोडण्यात आले. यानंतर तिने दावा केला की, ती ममता कुलकर्णी नसून आयेशा बेगम आहे.
मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान ममताने आपल्यावर होणारे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले होते. ड्रग्ज माफिया म्हणून विकीचं जेव्हा नाव येतं, तेव्हा माझंही नाव घेतलं जातं. खरं तर माझा त्याच्याशी वैवाहिक संबंध नाही. विकी आणि माझे कोणतेही शारीरिक संबंध नाहीत. आमच्यात केवळ चांगले संबंध आहेत. विकीचा ड्रग्जशी काहीही संबंध नाही. ड्रग्जसारख्या गोष्टींना माझा विरोध आहे. विकीनं तसं केलं असतं तर मीच त्याला ठार मारलं असतं, असे स्पष्टीकरण तिने दिले होते. ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरही या मुलाखतीत भाष्य करताना तिनं ड्रग्ज रॅकेटशी संबंधित बैठकांसाठी अनेक देशांत गेल्याचा आरोप माझ्यावर होतोय, पण मी कुठेही गेले नाही. 2006 ते 2016 या दहा वर्षांच्या कालावधीचा केवळ केनिया आणि दुबईचा व्हिसा माझ्याकडे आहे. तसंच माझ्या बँक खात्यात केवळ 25 लाख रुपये आहेत. रॅकेटशी संबंधित व्यक्तींच्या खात्यातून पैशांचे कोणतेही व्यवहार झालेले नाहीत. जे सत्य आहे ते लवकरच समोर येईल, असे म्हटले होते. पण याबाबतचे अंतिम सत्य कधी समोर आलेच नाही. यंदाच्या महाकुंभाप्रमाणेच 2013 मध्येही ममता साध्वी झाल्याचे वृत्त झळकले होते. त्यावेळीही ती प्रयागराजमधील महाकुंभामध्ये पोहोचली होती. एकूणच पाहता ममता कुलकर्णीची कारकीर्द ही अभिनयापेक्षा वादांनीच अधिक गाजल्याचे दिसले आहे. ममतासंदर्भातील हे वादंग आणखी काही काळ चालेल असे दिसते. पण ग्लॅमर, झगमगाटाच्या मोहापायी आयुष्य कसे भरकटत जाते याची करुण कहाणी म्हणून ममताच्या या प्रवासाकडे पाहिले जाते.