Kamaal Khan Arrest: अभिनेता कमाल राशिद खान उर्फ KRK ला अटक झाली आहे. मुंबई पोलिसांनी दोन राऊंड गोळीबार प्रकरणी त्याला अटक केली आहे. या गुन्ह्यातील तो प्रमुख संशयित आहे. केआरके सध्या ओशीवारा पोलीसांच्या ताब्यात असून त्याला शुक्रवारी रात्री उशिरा ओशीवारा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केआरके याने या गोळीबाराची जबाबदारी स्विकारली आहे. त्याने स्टेटमेंट देऊन त्याने आपल्या परवाना असलेल्या बंदुकीतून फायरिंग केलं आहे असं सांगितलं आहे.
पोलिसांनी केआरकेकडून परवाना असलेली बंदुक जप्त केली आहे. याबाबतची कागदी कारवाई सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना १८ जानेवारी रोजी घडली. केआकेने अंधेरी मधील ओशिवारा येथील आपल्या रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये दोन राऊंड फायर केले होते.
नालंदा सोसायटीमध्ये फायर झालेले दोन राऊंड रिकव्हर करण्यात आले आहेत. एक फायर दुसऱ्या मजल्यावर तर दुसरा फायर चौथ्या मजल्यावर करण्यात आला होता. एक फ्लॅट हा लेखक आणि दिग्दर्शकाचा आहे तर दुसरा फ्लॅट हा मॉडेलचा आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ओशीवारा पोलीस ठाण्याची १८ जणांची टीम तयार करण्यात आली आहे. संजय चव्हाण यांच्यासोबत क्राईम ब्रांचचा काही टीम्स या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांना या प्रकणात सुरूवातीला कोणाताच पुरावा मिळत नव्हता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील काही मिळालं नाही.
मात्र फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं पोलिसांनी हा गोळीबार कमाल आर खानच्या बंगल्यातून झाला असावा अशी शक्यता वर्तवली. दरम्यान, या बाबत आता कागदी कारवाई सुरू असून कमाल खानला आज शनिवारी सकाळी अधिकृतरित्या अटक करण्यात येईल.
कमाल खान हा त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वादामुळेच जास्त चर्चेत असतो. आता तो या नव्या प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.