

फलटण : सोमंथळी (ता. फलटण) येथील 27 वर्षीय तरुणाचा अनैतिक संबंधातून निर्घृण खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेसह तिचा पती व प्रियकराला फलटण पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांनाही दि. 30 जानेवारीपर्यंत आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेत पोलिस मुळाशी जाऊन तपास करत असून आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची खातरजमा केली जात आहे.
लखन बंडू बुधावले, सतीश तुकाराम माने, रेश्मा लखन बुधावले, अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. सतीश ऊर्फ आप्पा दादासो दडस हे बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. त्याबाबतचा तपास सुरू असताना त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
दि. 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी झालेल्या वादानंतर संशयितांनी लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून सतीश दडस याला जखमी केले. त्यानंतर त्याला उपचारासाठी नेत असल्याचे दाखवून मंगोबा माळ येथे नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या करवतीने तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे टाकलेल्या जागेची पाहणी केली. मात्र यासंदर्भात पोलीस सूत्राकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. तपास फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत सुबनावळ करत आहेत.