राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर रावरंभा या आगामी ऐतिहासिक चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. अभिनेता ओम भूतकर "राव" ही भूमिका साकारत असून "रंभा"ची भूमिका अभिनेत्री मोनालिसा बागल साकारणार आहे. तर रावरंभा चित्रपटामध्ये अभिनेते गिरीश कुलकर्णी कोणती भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात आहे.
शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.
ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. आगामी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित हा चित्रपट वेगळा ठरणार आहे.
या चित्रपटातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
इतिहासाच्या पानांमध्ये ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे.
गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर यांनी या पूर्वी देऊळ, फास्टर फेणे अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांनीही आपल्या कसदार अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र हा चित्रपट या दोघांचाही पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. त्यामुळे या दोन मातब्बर अभिनेत्यांना ऐतिहासिक चित्रपटात एकत्र पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.