जागतिक रंगभूमी दिन साजरा झाला. तो दिवाळीत आल्याने उत्सवात उत्सव साजरा झाला. गेली दीड वर्षे रंगभूमी शांतच होती. प्रत्यक्ष नाट्यगृहात नाटके साजरी होत नसली, तरी राजकीय रंगभूमीवर रोज एक नाटक सादर होत होते. संहिता ही त्यांचीच, अभिनय ही त्यांचाच, प्रयोगही तेच सादर करणार. फक्तदिग्दर्शन बारामतीकरांचे असा एकूण मामला होता.
एरव्ही नाटकांचा समाजावर काय परिणाम होतो, हे समजत नाही; पण या राजकीय रंगभूमीचे वैशिष्ट्य असे, की या राजकीय नाटकांचा ते नाटक सादर करणार्या नेत्याच्या रूपातील नटावर खोल परिणाम होतो. या नाटकांमुळे अनेकांना 'इडी'ची, तर अनेकांना इन्कम टॅक्सची फेलोशिप मिळाली. अनेकांची पदोन्नती होऊन त्यांना जेल रंगभूमीवर कला सादर करण्याची संधी मिळाली. कोरोना संकटात सगळे काही ठप्प असताना आणि माणसे जगण्या-मरण्याची लढाई लढत असतानाही राजकीय रंगभूमीवरचे प्रयोग सुरूच होते.
राजकीय रंगभूमी प्रवाही ठेवल्याबद्दल समस्त राजकीय पक्षांच्या या अभिनेत्यांचे विशेष पुरस्कार देऊन अभिनंदन करायला हवे. नेते किती उत्तम अभिनेते असतात, हे नेहमीच पाहायला मिळते. या कोरोना संकटात राजकारणाला ऊत आला होता तेव्हा या नेत्यांमधील अभिनेत्यांचे जवळून दर्शन घडले. कोरोनाच्या संकटापूर्वी राजकीय रंगभूमीवर फिरत्या रंगमंचाचा प्रयोग झाला. एरव्ही नाटकांचा रंगमंच फिरतो. या राजकीय महानाट्यात माणसेच फिरली आणि अभिनेत्यापेक्षा आपण किती सरस आहोत, हे त्यांनी दाखवून दिले. इतके बेभरवशाचे नाटक 'खंजीर'नंतर लोकांनी प्रथमच पाहिले आणि मत दिल्यानंतर आपण किती हतबल असतो, हेही अनुभवले.
असो, या राजकीय रंगभूमीविषयी बोलावे तेवढे थोडेच आहे; पण खरीखुरी मराठी रंगभूमी काय करत आहे? ते पडदा उघडायला आणि घंटा वाजवायला तयारच नाहीत. शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन धूमधडाक्यात साजरे करण्याच्या मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या. जब्बार पटेल नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळे शंभरावे संमेलन जोरात होईल, असे वाटले होते. संमेलनाचा प्रयोग सुरू होण्याची तिकडे घंटा वाजण्यापूर्वी नाट्य परिषदेत धोक्याची घंटा वाजली. बरीच उलथापालथ झाली. राजकीय नेत्यांच्या वळचणीला गेले की, असे होतेच. त्या नादात परिषदेला शंभराव्या संमेलनाचा आणि अध्यक्षांचा विसर पडला.
त्या साहित्य संमेलनवाल्यांकडे बघा. नाट्य परिषदेचे लोकं करणार नाहीत एवढी नाटके त्यांनी केली. प्रथेप्रमाणे अनेक वाद घालून संमेलन माध्यमात गाजत ठेवून नाशिकच्या संमेलनाचा घाट घातलाच. तारखाही ठरवल्या. ऐवढेच नाही, तर मार्चपूर्वी ठाले-पाटलांची मुदत संपण्यापूर्वी पुढचे संमेलन होईल, याची तयारीही करून ठेवली. नवा बकरा शोधला. नाटकवाले नसतानाही साहित्य संमेलनवाल्यांना इतकी नाटके जमतात, तर ती इतकी नाटके करणार्या नाट्य संमेलनवाल्यांना का जमू नयेत? त्यांनी आता साहित्य संमेलनवाल्यांकडून नाटकाचे प्रशिक्षण घेणे चांगले.
– झटका