Disha Patani Mouni Suraj relationship: मौनी रॉय आणि सुरज नाम्बियार यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याच्या चर्चा सुरू आहेत. या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. त्यातच आता दिशा पटानीने देखील सुरज नाम्बियारला अनफॉलो केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. दिशा पटानी ही मौनी रॉयची चांगली मैत्रिण आहे. ती तिच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते. या दोघींची केमेस्ट्री चांगली आहे. त्यामुळं मौनी पाठोपाठ दिशाने देखील सूरज नाम्बियारला अनफॉलो केल्यानं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
चार वर्षापूर्वी मौनी आणि सुरज यांनी सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेत लग्न केलं होतं. जानेवारी २०२२ मध्ये लग्न झाल्यानंतर मौनी आणि सुरज हे सातत्याने माध्यमांसमोर जोडीनं येत होते. ते सोशल मीडियावर आपल्या सुखी संसाराची क्षणचित्रे देखील शेअर करत होतीत.
मात्र आता इन्स्टाग्रामवरील त्यांच्या कृतीने चाहत्यांच्या मनात धस्स झालं आहे. या दोघांमध्ये नेमकं काय झालं आहे याबाबत चाहते चर्चा करत आहेत. या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. जरी या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं असलं तरी मौनीने सुरज सोबतच्या लग्नाचे काही फोटो आणि पोस्ट तशाच ठेवल्या आहेत. सुरजने देखील तसंच केलं आहे.
चाहते इतके काळजीत आहेत की त्यांनी सूरजच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्सचा पूर आणला आहे. एका युजरने, तुम्ही दोघं प्रेमात असल्याचं दिसत होतं. मग आता काय झालं? अशी विचारणा केली आहे. सूरजने यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सूरज हा एक उद्योगपती असून तो दुबईतील इनव्हेस्टमेंट बँकर आहे. तो बंगळुरूमधील जैन कुटुंबाशी संबंधित आहे. मौनी ही अभिनेत्री आहे. या दोघांनी गोव्यात जानेवारी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनी मल्याळी आणि बंगाली दोन्ही पद्धतीनं लग्न केलं होतं.