

isha ambani met gala 2026 look wore gaurav gupta gloden saree nita ambani jewellery details viral photos
पुढारी ऑनलाईन :
ईशा अंबानी आपल्या लुक्ससोबत प्रयोग करण्यास कधीच मागे राहत नाहीत. पण मेट गाला 2026 साठी त्या जेव्हा पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या लुकचा इतका ड्रीमी आणि कलात्मक अविष्कार असेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. आईच्या शाही दागिन्यांसह, 150 तासांत तयार झालेला गजरा आणि ब्लाउजवर लावलेली निजामांची सरपेच अशा अनेक वेगवेगळ्या घटकांनी त्यांनी परदेशी मंचावर पुन्हा एकदा भारताचा अभिमान वाढवला.
न्यूयॉर्कमध्ये आयोजित फॅशनच्या सर्वात मोठ्या रात्रीत म्हणजे मेट गाला 2026 मध्ये ईशा अंबानींचा अंदाज सर्वांच्या नजरा खेचून गेला. त्यांच्या कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट नेहमीच चर्चेत असते, पण यावेळी सोन्याच्या धाग्यांनी विणलेल्या साडीसोबत आईच्या दागिन्यांपासून बनवलेला ब्लाउज घालून त्यांनी भारतीय कारागिरीचे अप्रतिम दर्शन घडवले. त्यांचा लुक राजेशाही आणि अत्यंत सुंदर वाटत होता, ज्याची चर्चा जगभर झाली.
विशेषतः ब्लाउजवरील निजामांची सरपेच आणि 150 तासांत तयार झालेल्या गजऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, त्यांच्या हातात दिसणारा साधा आंबाही सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणारा ठरला. एका बाजूला इतक्या मौल्यवान वस्तू आणि दुसऱ्या बाजूला साधा आंबा हा विरोधाभास खास ठरला.
गौरव गुप्तांची कस्टम साडी
सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनायता श्रॉफ यांनी ईशाच्या मेट गाला लुकचे स्टायलिंग आणि क्रिएटिव्ह डायरेक्शन केले. या लुकमध्ये कला, हस्तकला आणि कुट्यूरचा सुंदर संगम दिसून आला. प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी ही कस्टम साडी तयार केली असून ती खऱ्या सोन्याच्या धाग्यांनी विणली आहे. सुमारे 50 कारागिरांनी 1200 तासांहून अधिक वेळ घालवून ही साडी तयार केली.
पिछवाई पेंटिंगपासून प्रेरित डिझाइन
ईशा यांची साडी शुद्ध सोन्याच्या धाग्यांपासून बनवल्याचे सांगितले जाते. या साडीत भारताच्या समृद्ध वस्त्र आणि कलात्मक परंपरेची झलक दिसते. यावर हाताने रंगवलेले आणि कढाई केलेले डिझाइन आहेत. पिछवाई पेंटिंगपासून प्रेरित नमुने सॉफ्ट गोल्ड आणि अर्थी टोनमध्ये अतिशय आकर्षक दिसतात. साडी ओपन पल्लूसह आधुनिक पद्धतीने नेसली असून त्यासोबत गोल्डन केप परिधान केली आहे, ज्यामुळे लुक अधिक नाट्यमय आणि कलात्मक वाटतो.
डायमंड ब्लाउजने वेधले लक्ष
ईशाचा ब्लाउजही तितकाच खास आणि राजेशाही आहे. सुमारे 1800+ कॅरेट वजनाचे 200 ओल्ड कट-माइन डायमंड्स असलेला हा स्ट्रॅपी डीप नेक ब्लाउज तयार करण्यासाठी 2000 तास लागले. या ब्लाउजवर नीता अंबानी यांच्या वैयक्तिक कलेक्शनमधील दागिने वापरले गेले असून मेटॅलिक झरदोजी कामामुळे तो अधिक आलिशान दिसतो. निजामांच्या कलेक्शनमधील सरपेच ब्लाउजच्या मागील बाजूस लावण्यात आली असून ती या लुकचा विशेष भाग ठरते. या ब्लाउजची किंमत कोटीत असल्याचे सांगितले जाते.
150 तासांत तयार झालेला गजरा
ईशाचा गजरा देखील अत्यंत खास आहे. ब्रुकलिनस्थित कलाकार सौरभ गुप्ता यांनी तो 150 तासांत तयार केला आहे. हा पारंपरिक फुलांचा गजरा नसून पेपर, कॉपर आणि ब्रासपासून तयार केलेला जॅस्मिन-प्रेरित हेअर अॅक्सेसरी आहे. केस अर्ध्या बनमध्ये बांधून त्यांनी हा लांब गजरा परिधान केला.
बॅगऐवजी हातात आंबा
यावेळी ईशा नेहमीप्रमाणे लक्झरी बॅग न घेता हातात आंबा घेऊन रेड कार्पेटवर आल्या. मात्र हा खरा आंबा नसून प्रसिद्ध कलाकार सुबोध गुप्ता यांनी तयार केलेले आंब्याच्या आकाराचे एक आर्ट स्कल्प्चर आहे. या आर्ट पीसमुळे त्यांच्या लुकमध्ये भारतीय वारसा आणि आधुनिक कलेचा सुंदर संगम दिसून आला.
आईचे दागिने परिधान
लुक पूर्ण करण्यासाठी ईशाने आई नीता अंबानी यांच्या वैयक्तिक कलेक्शनमधील दागिने परिधान केले. त्यांच्या गळ्यात 250 कॅरेटपेक्षा अधिक वजनाचे दोन नेकलेस होते. कानात डायमंड इयररिंग्स आणि हातात डायमंड रिंग्स घालून त्यांनी आपला राजेशाही लुक पूर्ण केला.