Dhurandhar 2 Drone Controversy Pudhari
मनोरंजन

Dhurandhar 2: धुरंधरच्या शूटिंगला ब्रेक; चित्रपटाच्या मॅनेजरविरोधात FIR दाखल, नेमकं काय घडलं?

Dhurandhar 2 Drone Controversy: Dhurandhar 2 च्या शूटिंगदरम्यान दक्षिण मुंबईतील हाय-सिक्युरिटी भागात परवानगीशिवाय ड्रोन वापरल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोकेशन मॅनेजर रिंकू राजपाल वाल्मिकी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Rahul Shelke

Dhurandhar 2 Drone Controversy: मुंबईतील हाय-सिक्युरिटी परिसरात परवानगीशिवाय ड्रोन वापरून शूटिंग केल्याप्रकरणी धुरंधर 2 चित्रपटाच्या लोकेशन मॅनेजरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात लोकेशन मॅनेजर रिंकू राजपाल वाल्मिकी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 233 अंतर्गत (कायदेशीर आदेशांची जाणीवपूर्वक अवहेलना) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही घटना दक्षिण मुंबईतील फोर्ट भागात घडली असून हा परिसर हाय-सिक्युरिटी झोनमध्ये येतो. येथे ड्रोन वापरण्यास बंदी आहे. मात्र तरीही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ड्रोनचा वापर करण्यात आला, तसेच यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचा आरोप आहे.

तक्रारदारांच्या माहितीनुसार, जानेवारीच्या अखेरपासून या ठिकाणी शूटिंग सुरू झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी चित्रपटातील प्रमुख अभिनेता संजय दत्त यांच्यासह संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. हा शूटिंगचा तिसरा दिवस होता. याच वेळी ड्रोन उडवण्यात आला. हे लक्षात येताच संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर शूटिंग थांबवण्यात आले.

फोर्ट परिसरात ‘पाकिस्तानची गल्ली’

30 जानेवारी रोजी चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमने फोर्ट परिसरात पाकिस्तानमधील जुन्या गल्ल्यांसारखा सेट उभारला होता. सुरुवातीला गर्दी कमी होती, मात्र 1 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. त्यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता.

तक्रार दाखल झाल्यानंतर लोकेशन मॅनेजर रिंकू राजपाल यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले असले, तरी त्यांच्या विरोधातील एफआयआर कायम ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, ‘धुरंधर’च्या यशानंतर येणारा धुरंधर 2 हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर 3 फेब्रुवारीला रिलीज झाला असून काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र रिलीजआधीच झालेल्या या वादामुळे चित्रपट चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT