AI Image 
मनोरंजन

Amitabh Bachchan : बंगला भव्य, पण 'बिग बीं'च्या वाट्याला केवळ एकच खोली! इतर सर्व खोल्यांवर जया बच्चन यांचीच ‘मालकी’

KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांची कबुली

रणजित गायकवाड

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाइतकेच हजरजबाबी स्वभावासाठीही प्रसिद्ध आहेत. एखाद्या गंभीर प्रसंगातही आपल्या मिश्किल टिप्पणीने वातावरण हलकेफुलके करण्याची त्यांची खासियत आहे. सध्या 'कौन बनेगा करोडपती १८' या लोकप्रिय क्विझ शोचे सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बींनी नुकताच आपल्या कौटुंबिक आयुष्यातील असाच एक भन्नाट किस्सा सांगितला. विशेष म्हणजे, हा किस्सा त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी संबंधित आहे.

अमिताभ बच्चन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आलिशान बंगल्यात स्वतःच्या वाट्याला केवळ एक छोटीशी खोली आली आहे, तर घरातील इतर खोल्यांवर जया बच्चन यांचेच राज्य आहे. जेवणासाठी स्वतंत्र खोली, बसण्यासाठी वेगळी खोली आणि इतरही अनेक खोल्या जया यांच्या वापरासाठी आहेत. बिग बींनी ही गोष्ट इतक्या मिश्किल अंदाजात सांगितली की, केबीसीच्या मंचावर एकच हशा पिकला.

केबीसीच्या मंचावर उलगडला घरातील 'रूमचा' किस्सा

'कौन बनेगा करोडपती १८' च्या एका भागात दीपक नावाचे स्पर्धक सहभागी झाले होते. व्यवसायाने म्युरल आर्टिस्ट असलेल्या दीपक यांनी भिंतींवर सुंदर कलाकृती साकारण्याच्या आपल्या कलेची माहिती अमिताभ बच्चन यांना दिली. त्यांच्या कलेने प्रभावित झालेल्या बिग बींनी आपल्या घरातील भिंतींवरही अशाच प्रकारची कलाकुसर करून घेण्याची इच्छा व्यक्त केली.

याच गप्पांदरम्यान त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्या आवडीबद्दल सांगितले. जया यांना घराच्या भिंती चित्रांनी आणि कलाकृतींनी सजवण्याची विशेष आवड आहे. त्यामुळे आपल्या खोलीच्या भिंतींवरही काहीतरी सुंदर कलाकृती साकारण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यानंतर त्यांनी केलेली टिप्पणी अधिकच लक्षवेधी ठरली.

'घरात पतीसाठी फक्त एक छोटीशी खोली!'

अमिताभ बच्चन म्हणाले, "मी माझ्या खोलीचा उल्लेख यासाठी करत आहे, कारण पतीदेवांसाठी घरात केवळ एक छोटीशी खोलीच असते. बाकी सर्व खोल्या मॅडमच्या आहेत. त्यांची जेवणाची खोली वेगळी आहे, बसण्यासाठी स्वतंत्र खोली आहे आणि इतरही अनेक खोल्या त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे आमच्यासाठी काहीच शिल्लक राहत नाही."

बिग बींच्या या विधानाने उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुढे त्यांनी जया बच्चन यांच्या घर सजवण्याच्या आवडीबद्दलही सांगितले. त्यांच्या घराच्या बाहेरील चारही भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या भिंतींवर पारंपरिक वारली चित्रकलेचा वापर करण्यात आला आहे. ही कलाकुसर अत्यंत आकर्षक दिसत असल्याचेही अमिताभ यांनी नमूद केले. स्पर्धक दीपक यांच्या कलेने प्रभावित झाल्यानंतर आपल्या खोलीच्या भिंतीही अशाच पद्धतीने सजवण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

१९७३ मध्ये अमिताभ-जया विवाहबंधनात

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या प्रेमकहाणीला पाच दशकांहून अधिक काळ लोटला आहे. चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. विशेषतः 'जंजीर' चित्रपटाच्या यशानंतर त्यांच्या नात्याला नवे वळण मिळाले. अखेर ३ जून १९७३ रोजी दोघांनी विवाह केला. अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता.

विवाहानंतर या दाम्पत्याच्या आयुष्यात श्वेता आणि अभिषेक या दोन मुलांचे आगमन झाले. श्वेता बच्चन यांचा जन्म १९७४ मध्ये, तर अभिषेक बच्चन यांचा जन्म १९७६ मध्ये झाला. आज बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कुटुंबांपैकी एक आहे.

कुटुंबासाठी जया बच्चन यांनी घेतला होता अभिनयातून ब्रेक

जया बच्चन यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. 'गुड्डी', 'अभिमान', 'चुपके चुपके', 'मिली' आणि 'सिलसिला' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. मात्र, विवाहानंतर आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी चित्रपटांमधील काम कमी केले.

१९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सिलसिला'नंतर जया यांनी दीर्घकाळ चित्रपटांपासून अंतर ठेवले. त्यानंतर १९९८ मध्ये गोविंद निहलानी यांच्या 'हजार चौरासी की माँ' या चित्रपटातून त्यांनी पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या मंचावर सांगितलेला हा छोटासा घरगुती किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पडद्यावर नेहमीच रुबाबदार आणि गंभीर भूमिकेत दिसणारे बिग बी प्रत्यक्ष आयुष्यात पत्नीसमोर कसे मिश्किल होतात, याची झलक त्यांच्या या वक्तव्यातून पाहायला मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT