पुणे : पुढारी वृत्तसेवा
माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाल्यानंतर सोमय्या आज (शुक्रवार) पुन्हा महापालिकेत पोहचले. या निमित्ताने भाजपने केलेल्या शक्तीप्रदर्शनात कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचे दर्शन घडले. पक्ष कार्यालयाकडून कार्यकर्त्यांच्या रेटारेटीतच सोमय्या महापालिकेत पोहचले. दरम्यान सोमय्या जेथे पडले होते, तेथे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांचा सत्कार केला.
जम्बो कोवीड सेंटरच्या भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी सोमय्या शनिवारी महापालिकेत आले होते. यावेळी शिवसैनिकांनी सोमय्या यांना महापालिकेतील कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोमय्या यांनी ते घेण्यास नकार दिल्याने शिवसैनिकांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी उडालेल्या गोंधळात झालेल्या धक्काबुकीत सोमय्या हे इमारतींच्या पायर्यांवर पडले आणि त्यात जखमीही झाले. यावेळी सोमय्या यांच्या सोबत दोन तीन कार्यकर्तेच का होते, इतर पदाधिकारी व नगरसेवक का नव्हते, अशी विचारणा वरीष्ठ पातळीवरून शहरातील नेत्यांना करण्यात आली होती. यावरून शहरातील पदाधिकार्यांना व नेत्यांची चांगलीच कानउघडणी झाल्याची चर्चा सुरू आहे.
या सर्व घडामोडीनंतर सोमय्या शुक्रवारी पुन्हा महापालिकेत आले. यानिमित्ताने भाजपकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच सत्कार कार्यक्रमाला काँग्रेसने विरोध दर्शिवल्याने महापालिका परिसारात महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे सकाळपासून नागरिकांना पालिका भवनात सोडणे बंद करण्यात आले होते. महापालिकेच्या सर्व प्रवेशद्वारावर तगडा बंदोबस्त तैनात होता. कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात नव्हता.
सोमय्या बेहर जाण्याच्या प्रवेश द्वारातून साडेचारच्या सुमारास पालिकेत आले. यावेळी पालिकेच्या पायऱ्यांवर बोटावर मोजता येतील इतकेच नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. तर भाजप पक्ष कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते.
पालिकेत आलेले सोमय्या गाडीतून खाली उतरण्यापूर्वीच सभागृहनेते गणेश बिडकर व सोमय्या यांची काहीतरी चर्चा झाली. त्यानंतर सोमय्या यांची गाडी प्रवेश गेटने पक्ष कार्यालयाकडे गेली.
शिवाजी रस्त्यावरच सोमय्या यांनी आपली गाडी सोडली. ते कार्यकर्त्यांच्या गराड्यात गेले, तेथे घोषणाबाजी झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या गराड्यात पालिकेकडे पायी निघाले. यावेळी पोलिसांनी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते व पोलिस यांच्या मोठ्या प्रमाणात रेटारेटी झाली. या रेटारेटीचा सोमय्या यांनाही चागलाच फटका सहन करावा लागला. शेवटी पोलिसांचे कडे व बॅरीकेट्स तोडून सोमय्या व कार्यकर्ते घोषणाबाजी व रेटारेटी करत पालिका परीसरात पोहचले. रेटारेटीमुळे सुरक्षा रक्षकांनी सोमय्या यांना हिरवळीवरूनही सोमय्या महापालिका भवनाच्या पायऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांच्या गोंधळात व रेटारेटीतच पोहचले.
सोमय्या पायऱ्यावर पोहचल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू केला. कार्यकर्त्यांच्या रेटा रेटीतून वाट काढत सोमय्या भवनात गेले. पायऱ्यावर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती. काही वेळीने सोमय्या पून्हा पायऱ्यावर आले. शहराध्यक्ष मुळीक यांनी ते जेथे पडले होते, तेथेच त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार समजय राऊत यांच्यावर टिका केली. नमतर ते अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आत गेले.
यावेळी पत्रकारांनी शहराध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार केला, मात्र उत्तरे न देता कार्यकर्ते घोषणा देऊ लागले. कार्यकर्ते शहर कार्यालयाकडे गेल्यानंतर सोमय्या साडे पाच वाजता महापालिकेतून बाहेर पडले.