सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहरातील कांदा व्यापार्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. केरळातील दोन वेगवेगळ्या कांदा एजन्सीजने सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा व्यापार्याकडून 2019 ते 2021 दरम्यान टप्याटप्याने जवळपास 4 कोटी 55 लाख 95 हजार 71 रुपयांचा कांदा खरेदी केला. (Solapur)
सोलापुरातील व्यापार्याने पैशांची मागणी केली असता टाळाटाळ केली. अखेर सोलापूर मार्केट यार्डातील व्यापारी साजिद हुसेन अजमेरी (रा बेगम पेठ,सोलापूर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोलापूर पोलिसांनी केरळ राज्यातील मुबारक एजन्सीचे मालक नजीब हमजा अंचलन (रा पलक्कड,राज्य केरळ) व मुबारक ट्रेडर्सचे मालक फतेह हमजा अंचलन (रा. जि. पलक्कड,राज्य केरळ) या दोघां विरोधात गुन्हा फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी साजिद हुसेन अजमेरी यांचे भारत ओनियन नावाने सोलापूर मार्केट यार्डात कांद्याचे आडत व्यवसाय आहे. केरळातील नजीब हमजा अंचलन आणि फतेह हमजा अंचलन यांनी साजिद अजमेरी यांच्या कडून मोठ्या प्रमाणात कांदा घेतला. सुरुवातीला घेतलेल्या कांद्याची रक्कम वेळोवेळी दिली होती. यानंतर साजिद अजमेरी यांनी विश्वासाने केरळातील या दोघा व्यापार्यांना 23 नोव्हेंबर 2019 ते 20 ऑक्टोबर 2021 दरम्यान 4 कोटी 55 लाख 95 हजारांचा कांदा विक्री केला होता. या विश्वासाचा फायदा घेत केरळातील व्यापार्यांनी सोलापुरातील कांदा व्यापार्याची जबर फसवणूक केली आहे.
सोलापुरातील कांदा व्यापारी साजिद हुसेन अजमेरी यांनी 2021 पासून केरळातील मुबारक एजन्सी व मुबारक ट्रेडर्स या व्यापार्यांकडे साडेचार कोटी रुपयांच्या कांद्याच्या रकमेची मागणी केली. केरळातील दोघां व्यापार्यांनी कांद्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करत दोन वर्षे चालढकल केली. कोट्यावधी रुपयांची रक्कमेची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर 25 ऑगस्ट 2023 रोजी सोलापुरातील कांदा व्यापारी साजिद हुसेन अजमेरी यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.कोट्यवधी रुपयांची फसवणूक असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे एपीआय डी.बी. काळे करत आहेत.
हेही वाचा