Latest

‘मातेच्या कुशीतील निरागस बालकासारखा आनंद’

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा ः शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेकडून डी.लिट. ही सन्मानदर्शक पदवी स्वीकारताना 'आईच्या कुशीतील निरागस बालकाचा आनंद मनी दाटला आहे', अशी भावपूर्ण प्रतिक्रिया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली होती. शिवाजी विद्यापीठाने 21 नोव्हेंबर 1978 रोजी डी.लिट. ही सर्वोच्च सन्मानदर्शक पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला. तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. एस. भणगे यांच्या हस्ते मंगेशकर यांना डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली होती. यावेळी लता मंगेशकर यांना विद्यापीठातर्फे प्रदान केलेल्या गौरवपत्राचे वाचन केले होते.

दीनानाथ मृत्यूशय्येवर असताना त्यांनी लहानग्या लताला जवळ बोलावून सांगितले, 'माझा तंबोरा, चीजांची वही, मंगेशाची कृपा मी तुला देत आहे. दुसरं तुला देण्यासारखं आता माझ्याजवळ काही उरलं नाही. गळ्यातला पंचम सांभाळ, तोच तुला सर्व काही देईल'. आपल्या कन्येसाठी स्वरांचा जो कल्पवृक्ष दीनानाथांनी लावला, त्यातून सुवर्णाचे फलभार अखंड ओथंबू लागले. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. कुमार गंधर्वांनी लताबाईंच्या संबंधी म्हटले आहे, 'भारतीय गायिकांत लताच्या तोडीची गायिका दुसरी झालीच नाही'.

तीन साडेतीन मिनिटांचं तिचं ध्वनिमुद्रित गीत व शास्त्रीय गायकांची साडेतीन तासांची मैफल या दोहोंचं कलात्मक मूल्य एकच आहे, असं मानता, असा कलाकार शतकाशतकांतून एखादाच निर्माण होतो. तो आपल्या डोळ्यांसमोर वावरताना दिसतो, हे आपले केवढे भाग्य!
भालजी पेंढारकर म्हणतात त्याप्रमाणे, 'लताबाई खरोखरीच भगवंताची बासरी आहेत. या जादूगार गळ्याने किती एकाकी जीवांना आधार व आसरा दिला आहे. दूर, वैराण प्रदेशात देशाची रखवाली करणार्‍या सैनिकांनी व सेनानींनी कबूल केले आहे की, लताबाईंच्या सुरात त्यांना आपली घरदारं दिसतात आणि ते आपले एकाकीपण विसरू शकतात', असे गौरवपत्रात म्हटले होते.

प्रत्येकाला संगीतातून आनंदव समाधान देण्यासाठी प्रतिबद्धडी.लिट. स्वीकारल्यानंतर लतामंगेशकर यांनी छोटेखानी भाषणात विद्यापीठाप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. आयुष्यात आजवर अनेक सन्मान लाभले, मात्र शिवाजी विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थेने केलेल्या गौरवाचे मोल शब्दातीत आहे. याप्रसंगी माझ्या मातापित्यांची खूप आठवण होत आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला संगीताच्या माध्यमातून आनंद व समाधान देण्यासाठी प्रतिबद्ध राहीन, याची ग्वाही या निमित्ताने देते, असे त्यांनी भाषणात सांगितले होते.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT