पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेवून राजीनामा देण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता पण तसा घेतला नाही. कारण मला खात्री होती की मी सहकाऱ्यांसोबत चर्चा केली असती तर ती मान्य केली नसती. कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांचा आदर करतो. महाराष्ट्रा बाहेरूनही अनेक सहकारी आले आहेत. सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेवून अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात घेवू, अंतिम निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांची जी भावना आहे तिकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून आंदोलन सूरू आहे. पवार यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. मात्र, जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता, तर मला खात्री होती की सहकाऱ्यांनी मान्य केला नसता, असे त्यांनी स्पष्ट करतानाच पक्षाच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक सहकारी आले आहेत. माझी आणि त्यांची उद्या संध्याकाळ पर्यंत चर्चा होईल. ती झाल्यानंतर ज्या काही तुमच्या भावना आहेत त्याचा विचार करून आणि सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेवून अंतिम निर्णय येत्या एक दोन दिवसात घेवू. अंतिम निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांची जी भावना आहे तिकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. दोन दिवसानंतर तुम्हाला अस आंदोलन करत बसाव लागणार नाही. तुमच्या मनाप्रमाणे निर्णय होईल, अशी पवार यांनी कार्यकर्त्यांना ग्वाही दिली.
हेही वाचा :