जयंत पाटील यांचे काँग्रेसमध्ये स्वागतच, काँग्रेसचा कानोसा; राजकीय पट बदलणार! | पुढारी

जयंत पाटील यांचे काँग्रेसमध्ये स्वागतच, काँग्रेसचा कानोसा; राजकीय पट बदलणार!

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काँग्रेस पक्षात आले, तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांच्यामुळे पक्षाला बळकटी येईल, असे जिल्ह्यातील काँग्रेस नेते खासगीत सांगतात. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा, लोकसभेतील पक्षाचे संख्याबळ वाढेल, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला. कदाचित पाटील यांना मुख्यमंत्रिपदीही संधी मिळू शकते, असे काही राजकीय विश्लेषकांना वाटते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्य स्तरावर राजकीय घडामोडी गतीने घडत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यातही याचे पडसाद उमटत आहेत. बहुतांश पक्षातील नेत्यांनी पवार यांनीच नेतृत्व करावे, अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादीतील अनेकजण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आजच्या घडामोडीनुसार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे व राज्याचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्याची चर्चा सुरू आहे. यामुळे इतरही अनेक राजकीय तर्क-वितर्कांची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँगे्रसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबतच्या अंतर्गत हालचाली सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

 गरज वाटली नसेल

जयंत पाटील पक्षाच्या मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीला बुधवारी उपस्थित नव्हते. याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाची राष्ट्रीय स्तरावरील बैठक आहे. मला बोलवण्याची गरज वाटली नसेल, अशा मार्मिक शब्दात त्यांनी नाराजीला वाट मोकळी करून दिली.

तर बापूंचे स्वप्न पुरे होईल…

जयंत पाटील काँग्रेसमध्ये गेले तर पक्षाला उभारी येईल. पाटील यांच्या संपर्कातील राज्यस्तरावरील इतर अनेक नेतेही काँग्रेसमध्ये येऊ शकतात. सांगली जिल्ह्यातील पक्षाचे बळ वाढण्याबरोबर राज्यातील पाटील यांना मानणार्‍यांची संख्या वाढू शकते. यातून पाटील यांचा अभ्यास, संयम, काम करण्याचे कसब तसेच राजकीय डावपेचामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकते, असाही तर्क मांडला जातो. यामुळे ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांची मुख्यमंत्री होण्याची हुकलेली संधी जयंतराव पाटील यांना मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

Back to top button