काल सकाळी बातमी आली ती ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक रॉडनी मार्श गेल्याची आणि दिवस संपला तो फिरकीचा महान जादूगार शेन वॉर्नच्या (Shane Warne) निधनाच्या बातमीने. दोन भिन्न कालखंडातील हे क्रिकेटपटू असले तरी ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या आणि एकूणच क्रिकेट जगताच्या दृष्टीने एकाच दिवशी कॉट मार्श बोल्ड वॉर्न हे समीकरण क्लेशदायक आहे. मार्श वयाने तरी पंचाहत्तरीत होता; पण शेन वॉर्नचे 52 हे काय जाण्याचे वय आहे? आयुष्य किती क्षणभंगुर आहे आणि आजच्या व्यस्त लाईफस्टाईलचे परिणाम दाखवणारी ही घटना आहे. आपल्या अवघ्या 52 वर्षांच्या आयुष्यात वॉर्न तब्बल 15 वर्षे कसोटी खेळला. त्याच्या 145 कसोटीतले 708 बळी आणि 194 एकदिवसीय सामन्यातले 293 बळी असे एकूण 801 आंतरराष्ट्रीय बळी हे नुसते फलंदाजाला बाद करणे नव्हते तर यातला जवळपास प्रत्येक बळी हा लेगब्रेक गुगली गोलंदाजीचा नवनवा आविष्कार होता.
आपल्या सुभाष गुप्ते आणि ऑस्ट्रेलियाच्या बिल ओरिली, रिची बेनॉ या लेगब्रेक गुगली गोलंदाजानंतर कालखंड गाजवला तो पाकिस्तानच्या अब्दुल कादिरने. कादिर 1990 मध्ये निवृत्त झाल्यावर लेगब्रेक गुगलीचा वारसा पुढे कोण चालवणार अशी चर्चा रंगात असताना 1990 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंचावर प्रथम पाऊल ठेवले ते कुंबळेने आणि पाठोपाठ 1991-92च्या आपल्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यात पदार्पण केले ते शेन वॉर्नने (Shane Warne). कुंबळे आणि वॉर्नने पुढे कित्येक वर्षे धुमाकूळ घातला. पण दोघांच्या गोलंदाजीची स्टाईल वेगळी होती. शेन वॉर्न अर्थातच पारंपरिक पठडीतला लेग ब्रेक गोलंदाज निघाला. पदार्पणाच्या कसोटीत भारताच्या द्विशतकवीर रवी शास्त्रीचा एकमेव बळी मिळवताना त्याने तब्बल 145 धावा मोजल्या.
शेन वॉर्नच्या (Shane Warne) महानतेची कल्पना यायला उजाडावे लागले ते 1993 साल. याआधी घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने मेलबर्न कसोटीत 7 बळी मिळवून आपली चुणूक दाखवली होती. पण कुठल्याही इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब होते ते अॅशेसमधल्या कामगिरीवर. या 1993 च्या दौर्यात शेन वॉर्नने 6 कसोटीत 34 बळी मिळवत इंग्लिश फलंदाजी मर्व्ह ह्यूजच्या साथीने कापून काढली. पण त्या ओल्ड ट्रॅफर्डच्या पहिल्याच कसोटीत त्याने माईक गॅटींगला 'बॉल ऑफ सेंचुरी' टाकून त्रिफळाचित केले तिथून शेन वॉर्नने आपली खरी छाप पाडली. आजही मँचेस्टरला कुठलाही सामना बघताना डोळ्यासमोर दिसायला लागतात ते वॉर्न आणि गॅटिंग. जणू काही भुताटकीसारखा तो चेंडू होता. पण त्यातच शेन वॉर्नच्या हाताची जादू कळून येते. या कसोटीपासून वॉर्नने मागे वळून कधी पहिलेच नाही आणि कुठल्याही देशाविरुद्ध कुठल्याही खेळपट्टीवर तो ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाचा अविभाज्य भाग होता. वॉर्नचा प्रत्येक बळी ही नजाकत होती.
अगदी नमुन्यादाखल बोलायचे तर 1999 च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात हर्षिल गिब्जला बाद केले तो चेंडू, 2006 च्या अॅशेस मालिकेत अॅडलेड कसोटीत केव्हिन पीटरसनला बाद केला तो चेंडू किंवा अगदी आपल्या शेवटच्या मालिकेत 700 वा बळी घेणारा चेंडू असो, प्रत्येक चेंडू हा अप्रतिम होता. शेन वॉर्नच्या (shane warne) बळींवर एक पुस्तक लिहिता येईल इतकी विविधता त्याने पेश केली. शेन वॉर्नमध्ये एका क्लासिकल लेग स्पिनरकडे असणार्या सर्व युक्त्या होत्याच. पण त्याचा मैदानावरचा स्वभाव हा जलदगती गोलंदाजाच्या आक्रमकतेचा होता. यामुळेच त्याचे खेळणे संपल्यावर त्याच्या समालोचनातूनआणि विश्लेषणातून त्याची खेळाबद्दलचा वेगळा विचार करायची दिशा दिसून यायची.
खेळाडू आणि नंतर समालोचक म्हणून एक लोभस व्यक्तिमत्व असलेला वॉर्न मैदानाबाहेर अनेकदा वादग्रस्त घटनात अडकला तरी त्याची खेळाडू म्हणून प्रतिमा इतकी महान होती की त्या चुकाही क्षम्य ठरल्या. या फिरकीच्या जादूगाराकडून नव्या पिढीला अजून खूप शिकायचे बाकी होते. सकाळी ठखझ रॉड मार्श असा ट्विट करणार्या शेन वॉर्नला कल्पनाही नव्हती की काही वेळातच त्यालाही मार्शच्या मैदानातच जायचे आहे. मैदानावर कितीही मोठा जादूगार असला तरी नियतीच्या जादूगारापुढे काही चालत नाही. वॉर्नच्या अकाली जाण्याने मात्र क्रिकेट जगताचे अतोनात नुकसान झाले आहे.