पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने वाद उकरले जात आहेत, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते असेही म्हणाले की, राहुल गांधी यांनी वीर सावरकरांच्या बाबतीत केलेले वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाही आणि आम्ही सहन करणार नाही इथे हा विषय संपतो. वाचा सविस्तर बातमी.
आज सकाळी खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, राहुल गांधीनी वीर सावरकरांच्या बाबतीत केलेले वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाही आणि आम्ही सहन करणार नाही इथे हा विषय संपतो. राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आदी समस्यावर भाष्य करत ही यात्रा देशभर सुरु आहे. ही यात्रा सुरु असताना वीर सावरकरांवर बोलायचे काही कारण नव्हतं. वीर सावरकारांवर केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनाच नाही तर महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या नेत्यांनाही धक्का बसला आहे. इतिहासात काय केले आहे. यापेक्षा नवा इतिहास निर्माण करायला हवं याकडे राहुल गांधी यांनी लक्ष द्यायला हवं.
देशाच्या मोठ्या वर्गाला सावरकरांविषयी अभिमान आहे. सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी आमची कायमची मागणी आहे. मला कळत नाही की जे नवीन वीर सावरकर भक्त तयार झाले आहेत ते का मागणी करत नाहीत भारतरत्नाची. वीर सावरकर भाजपला आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला कधीही आदर्श नव्हते. असेही ते यावेळी म्हणाले. सावरकरांवर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून मविआमध्ये फूट पडू शकते. असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा