Latest

सातारा : जुन्या वादातून मनसे कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

अविनाश सुतार

पळशी; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे गेल्यावर्षी वाळू काढण्याच्या वादातून खुनी हल्ल्याचा प्रकार घडला होता. या रागातून प्रशांत भोसले याच्यासह ६ जणांनी वैभव विकास ढाणे (वय २८) या युवकाचा तलवार, कोयत्यासह धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. ही घटना श्री भैरोबा मंदिरासमोर गुरुवारी रात्री ११.४५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावमध्ये तणावाचे वातावरण असून गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी, जळगावमध्ये वैभव ढाणे व प्रशांत भोसले यांच्यामध्ये गावातील नदीपात्रातून वाळू उचलण्याच्या कारणावरुन वाद होते. त्यातून त्यांच्यामध्ये सातत्याने खटके उडत होते. गेल्यावर्षी वैभव ढाणे, विजय शिवाजी जाधव व निलेश विठ्ठल पवार यांनी प्रशांत भोसले याच्यावर त्याच कारणातून चाकूने वार केले होते. त्यामध्ये प्रशांत भोसले हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन वैभव ढाणे याच्यासह तिघांविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकारानंतर त्यांच्यामधील वैर वाढतच गेले. गुरुवारी रात्री वैभव हा भाऊ शुभम याच्यासह शेतात पाणी देण्यासाठी जाणार होता. कुटुंबात रात्री एकत्र जेवण केल्यानंतर वैभव हा पायीच भैरोबा मंदिराकडे चालत गेला. शुभम हा तंबाखूची पुडी आणण्यासाठी बाहेर गेला होता, तेथे मित्रांबरोबर बोलत बसल्याने त्याला वेळ झाला. घरी आल्यानंतर त्याने वैभव याला हाक मारली. मात्र, तो भैरोबा मंदिराकडे चालत गेल्याचे सांगितल्याने शुभम हा सीबीझेड मोटारसायकलवरुन मंदिराकडे गेला.

त्यावेळी गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात प्रशांत पांडुरंग भोसले, सौरभ संजय भोसले, किरण संजय भोसले, हुसेन बेग, मनोज शिरतोडे व रोहन सुभाष भोसले हे तलवार, कोयता व धारदार शस्त्राने वैभव याच्यावर वार करत असल्याचे दिसले. शुभम याला पाहताच मारेकर्‍यांनी पोबारा केला. मात्र, वैभव हा बेशुध्द अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नातेवाईक मदन जाधव यांच्यासमवेत शुभम याने स्वीफ्ट कारमधून वैभव याला तातडीने सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र त्याचा मृत्यु झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. तेथील पोलीस चौकीत घटनेची माहिती दिल्यानंतर पोस्टमार्टेम करण्यात आले. शुभम ढाणे याने दिलेल्या तक्रारीवरुन शुक्रवारी पहाटे कोरेगाव पोलीस ठाण्यात प्रशांत पांडुरंग भोसले, सौरभ संजय भोसले, किरण संजय भोसले, हुसेन बेग, मनोज शिरतोडे व रोहन सुभाष भोसले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन सावंत तपास करत आहेत.

वैभव ढाणेने भूषविले मनसेचे तालुकाध्यक्षपद

वैभव ढाणे हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला कार्यकर्ता होता. राजकारण व समाजकारणामध्ये तो सक्रीय होता. शिवसेनेतून राज ठाकरे हे बाहेर पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. त्यावेळी वैभव ढाणे याने तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याने मनसेच्या अनेक राजकीय आंदोलनांमध्ये भाग घेतला आहे. त्याच्या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT