गुरूवारी रात्री कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. हा भूकंप 2.8 रिश्टर स्केलचा असून 20 ऑक्टोबरपासून या परिसरात 11 भूकंप झाले आहेत. त्यामुळेच मागील आठवडाभरापासून कोयना परिसरात भूकंपाची मालिका सुरू झाल्याचे समोर आले आहे. (satara koyna earthquake)
गुरुवारी रात्री 11.57 वाजता 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 29.6 किलोमीटर अंतरावरील वारणा खोर्यात तनाली गावाच्या नैऋत्येस 13 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली सात किलोमीटर होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, 20 ऑक्टोबरपासून या परिसरात भूकंपाची मालिका सुरू झाली आहे. मागील आठ दिवसांपासून दोन ते चार रिश्टर स्केलच्या दहा भूकंपाची नोंद झाली आहे. 20 ऑक्टोबरला दोन तर 24 ऑक्टोबरला तब्बल 5 सौम्य भूकंपाची नोंद झाली होती. 25 ऑक्टोबरला दोन आणि 27 व 28 ऑक्टोबरला प्रत्येकी एक अशा 11 सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे.
20 ऑक्टोबरला 10.52 मिनिटांनी 1.8 रिश्टर स्केलचा तर दुपारी 1.50 मिनिटांनी 1.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. 24 ऑक्टोबरला 4.30 वाजता 2.2 रिश्टर स्केलचा, 5 वाजून 7 मिनिटांनी 3.9 रिश्टर स्केलचा, 6 वाजून 23 मिनिटांनी 2.4 रिश्टर स्केलचा, 8 वाजून 44 मिनिटांनी 2.4 रिश्टर स्केलचा तर 9 वाजून 29 मिनिटांनी 2.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे.
25 ऑक्टोबरला 8 वाजून 54 मिनिटांनी 2.4 रिश्टर स्केलचा, 7 वाजून 11 मिनिटांनी 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. 27 ऑक्टोबरला 12 वाजून 25 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केलचा तर 28 ऑक्टोबरला रात्री 11 मिनिटांनी 57 मिनिटांनी 2.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद कोयना भूकंपमापन केंद्रावर झाली आहे.