मुंबई, पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील ईडीच्या कारवाईचा चांगलाच समाचार घेतला. आज मुंबईत धाडीवर धाडी सुरू आहेत. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात धाडी पडतील, इतकंच काय जिथे जिथे सेनेच्या शाखा तिथे धाडी पडतील. सरकार पाडण्याच्या हेतूनं सुडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे. दिल्ली आणि मुंबईतील भाजपच्या नेत्यांकडे बेनामी संपत्ती आहे. या विषयी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. पुढच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करणार असून, त्यानंतर ईडीचे अधिकारी तुरूंगात जातील, असा इशारा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महाविकास आघाडीचे सरकार हे कायद्याने चालते, मात्र सरकार पाडण्याच्या सुडबुद्धीने ईडीची कारवाई केली जात आहे. मविआच्या १४ प्रमुख नेत्यांवर आतापर्यंत धाडी टाकण्यात आल्या आहेत. आयटी आणि ईडीला आम्ही ही ५० जणांची यादी आणि पुरावे दिले आहेत. त्यावर काय कारवाई होते ती पाहू.
ईडीनंतर आयटीची भानामती सुरू…
महाराष्ट्रात आता ईडीनंतर आयटीची भानामती सुरू असल्याचे सांगत राऊत यांनी बंगाल आणि महाराष्ट्रातीलच ठराविक लोकांवरच धाडी का पडतात? असा प्रश्न उपस्थित केला आहे. देशात सर्वात जास्त ईडीच्या कारवाया महाराष्ट्रात झाल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांकडे बेनामी संपत्ती असल्याचे सांगत या विषयी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
ईडीच्या कारवाईवर टीका…
ईडीकडून व्यावसायिक बिल्डरांना धमकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वसुली करणाऱ्या ४ ईडी अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केल्याचं त्यांनी सांगितले. ईडी भाजपची एटीएक मशीन असून, किरीट सोमय्या हे भाजपचे वसुली एजंट असल्याची खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.
पुढच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करणार असून, प्रकरणाच्या चौकशीनंतर हे अधिकारी तुरूंगात जातील असा इशारा राऊत यांनी दिला. केंद्रीय तपास यंत्रणांना जसा अधिकार आहे तसाच अधिकार राज्यातील पोलिसांना असल्याचे सांगतले.