पुढारी ऑनलाईन डेस्क :
महिलांचं आपल्या पती बद्दल असणार मत सगळीकडेच 'सारखं' असतं, याला सेलिब्रेटीही अपवाद नसतात. त्यामुळेच आपल्या पतीची खिल्ली उडवण्याची संधी मिळाली की, पत्नी सोडत नाही. याचा अनुभव पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याला एका मुलाखतीवेळी आला. त्याची पत्नी आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने शोएबची चांगलीच फिरकी घेतली.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हे पाकिस्तानमधील एक लोकप्रिय जोडी. पाकिस्तान क्रिकेट संघातील एक सभ्य आणि नम्र खेळाडू, अशी शोएबची ओळख आहे. मात्र पत्नी सानिया मिर्झाला हे मत मान्य नसल्याचे एका मुलाखतीवेळी स्पष्ट झालं.
'तुम्ही तुमच्या पत्नीचा वाढदिवस विसरला होता का? यावर सानियाची प्रतिक्रिया कशी होती', असा सवाल मुलाखतकाराने शोएबला केला. यावर तो म्हणाला की, माझ्याकडून काही चुका झाल्या तर त्यावर एकदाच प्रतिक्रिया येत नाही. सानियाच्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाही तर ती जुन्या गोष्टींना उजाळा देत मला सतत टोमणे मारते. यावर सानिया म्हणाली, तो स्वत:चा वाढदिवस विसरला याची मला पर्वा नाही; पण माझा वाढदिवस कसा विसरतो?
या वेळी शोएब म्हणाला की, सानिया खूप कमीवेळा खोटे बोलते. मात्र सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकताना ती काहीतरी लपवत असते. यावर सानिया म्हणाली, मी खोट बोलत नाही, असे नाही;पण खोटे बोलू नये यासाठी प्रयत्न करते. शोएब दिसतो तेवढा शांत आहे का, या प्रश्नावर सानियाने शोएबची फिरकी घेतली. ती म्हणाली, शोएब हा शांत आहे हेच मुळात खरं नाही. तुम्ही समजता तेवढा माझा नवरा साधा आणि शांत नाही. या उत्तराने शोएबही अवाक झाला.
हेही वाचलं का?