threat of 'digital house arrest'
धोका ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’चा Pudhari File Photo
संपादकीय

धोका ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’चा

पुढारी वृत्तसेवा
शहाजी शिंदे, आय.टी. तज्ज्ञ

सायबर गुन्हेगारीच्या विश्वातील आधुनिक ठकसेन नित्य नवे मार्ग अवलंबत आहेत. सध्या ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’ या घातक प्रकाराने अनेकांना भयभीत करून मोठ्या रकमेचा गंडाही घातला आहे. एका ज्येष्ठ डॉक्टरला डिजिटल हाऊस अरेस्ट केले आणि त्यांची 45 लाखांची फसवणूक झाली. इंदूरच्या एक जोडप्याला 53 तासांंपर्यंत हाऊस अरेस्ट केले आणि लाखो रुपये उकळले. वाराणसीत तीन दिवस डिजिटल हाऊस अरेस्टच्या माध्यमातून एकाचे 28.75 लाख रुपये हडपले गेले.

संशोधकाच्या एका पथकाने अलीकडेच जागतिक सायबर गुन्हे निर्देशांक तयार केला. यात सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत भारत 10 व्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. या निर्देशांकात शंभर देश असून यानुसार सायबर गुन्ह्याच्या बाबतीत रशिया आघाडीच्या स्थानावर आहे. यानंतर युक्रेन, चीन, अमेरिका, नायजेरिया, रोमानिया आणि उत्तर कोरियाचा क्रमांक लागतो. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतात 30 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक फसवणूक झाली आहे आणि गेल्या दशकांत भारतीय बँकांत फसवणुकीचे 65,017 गुन्हे दाखल झाले आहेत. हे आकडे झोप उडविणारे आहेत. भारतात सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढली असून त्याचे वेगवेगळे स्वरूपही दिसत आहेत. हॅकर्स, सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी रोज नवनवीन फंडे आहेत आणि गुन्हा तडीस नेत आहेत. आताची फसवणुकीची नवीन पद्धत ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’ आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी प्रयागराजमध्ये असेच एक प्रकरण समोर आले होते, ज्यात घोटाळेबाजांनी एका महिलेला तिच्या घरीच बंधक बनवून 1 कोटी 48 लाखांची फसवणूक केली होती. या महिलेने सांगितले की, तिला फोन आला होता. इंटरनॅशनल कुरिअर कंपनीच्या कर्मचार्‍याने हा कॉल केल्याचे भासविण्यात आले होते. तिच्या नावाने ड्रग्ज, लॅपटॉप आणि क्रेडिट कार्ड असलेले पार्सल तैवानला पाठवले जात असल्याचे त्याने महिलेला सांगितले. अशा कोणत्याही पार्सलबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे महिलेने सांगितल्यावर त्यांनी याबाबत तक्रार नोंदवत असल्याचे सांगितले. यानंतर महिलेला एक व्हिडीओ कॉल येतो, ज्याची पार्श्वभूमी पोलिस ठाण्याची होती. पोलीस अधिकार्‍याची तोतयागिरी करणार्‍या व्यक्तीने महिलेला व्हिडीओ कॉलवर सुमारे 3 दिवस ओलीस ठेवले आणि तिला धमकावून विविध खात्यांमध्ये 1 कोटी 48 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी दक्षता हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. तुम्हाला असे कॉल किंवा मेसेज येतात तेव्हा विचारपूर्वक निर्णय घ्या आणि त्याची तक्रार करा. अशा सायबर फसवणूक आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी सरकारने अलीकडे संचार साथी वेबसाईटवर चक्षू पोर्टल सुरू केले आहे. याशिवाय, तुम्ही जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करू शकता.

आजकाल ऑनलार्ईन गेमिंगच्या माध्यमातूनही फसवणूक केली जात आहे. फसवे कुरिअर, नातेवाईक, मित्राला अटक करण्याची धमकी, अश्लील व्हिडीओ आदी नवनवीन फंडे शोधत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. स्नॅप चॅट, फेसबुक आणि इन्स्टाग्रामदेखील फसवणुकीचे साधन ठरत आहे. मित्र किंवा नातेवाईकांचे बनावट प्रोफाईल तयार करून फसवणूक केली जात आहे. अलीकडच्या काळात कॉल फॉरवर्डिंगच्या माध्यमातून सायबर गुन्हे करणार्‍यांच्या घटनांत उल्लेखनीय वाढ झाली आहे. टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना कॉल फॉरवर्डिंगची सुविधा देतात आणि त्यानुसार कॉल किंवा एसएमएस फॉरवर्ड केला जातो. या सुविधेचा वापर मीटिंग किंवा आवश्यक कामात बिझी असताना केला जातो. या आधारावर एकही कॉल मिस होऊ नये, अशी अपेक्षा असते; पण हॅकर या सुविधेचा गैरफायदा उचलतात. या माध्यमातून स्कॅमर कॉल केला जातो आणि समोरील व्यक्तीला टेलिकॉम प्रोव्हायडर कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले जाते. आपल्या नेटवर्कमध्ये इश्यू असल्याचे खोटे सांगितले जाते. ही समस्या दूर करण्यासाठी स्टार 401 हॅशटॅग नंबर डायल करा, अशी सूचना करतात. ग्राहकही फसव्या कॉलला बळी पडतात. हा नंबर डायल केल्यानंतर ग्राहकांना अनोळखी नंबरवर कॉल करण्यास सांगितले जाते. याप्रमाणे ग्राहकाने कॉल करताच त्याचे सर्व कॉल आणि मेसेज हे स्कॅमरकडे पोहोचतात आणि सायबर गुन्हा घडवून आणला जातो. गुगल सर्चवर सातत्याने लोकांकडून अनेक प्रश्नांंची उत्तरे शोधण्यात येतात. युजरची हीच मानसिकता ओळखून ठकसेन गुगल पे, फोन पे, पेटीएमच्या नावाखाली म्हणून आपला नंबर इंटरनेटवर शेअर करतात. यामुळे काही मंडळी या फसव्या नंबरला बळी पडतात आणि अडकतात.

आता तर ब्राऊजर एक्स्टेंशनच्या डाऊनलोडिंगच्या माध्यमातूनही सायबर गुन्हे घडवून आणले जात आहेत. ही फसवणूक उपकरणात व्हायरस सोडून करण्यात येत आहे. सार्वजनिक चार्जर पोर्टच्या माध्यमातून मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये व्हायरस येतो. क्रोम, मोझिला आदी ब्राऊजरवर केलेले ऑनलाईन व्यवहार ब्राऊजरच्या सर्व्हरमध्ये सेव्ह होतात. अर्थात, ते सेटिंगमध्ये जाऊन डिलिट करण्याची गरज असते; मात्र काही जण कंटाळा करतात. त्याचा फायदा सायबर गुन्हेगार उचलतात. फिशिंगच्या माध्यमातून एखादी मोठी किंवा प्रसिद्ध कंपनी किंवा युजरच्या कंपनीचे खोटे संकेतस्थळ तयार केले जाते. त्याचे स्वरूप अगदी खर्‍या संकेतस्थळाप्रमाणे भासू लागते. यावर महागड्या वस्तू मोफत देण्याचे आमिष दाखविले जाते. शिवाय मोबाईलचे प्रस्थ वाढल्याने हॅकर्स मेसेज किंवा व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातूनही व्हायरसयुक्त मेसेज पाठवतात. हॅकर्सने सोडलेले मालवेअर संगणक, मोबाईल, टॅबच्या इन्स्टॉल सॉफ्टवेअरचे नुकसान करण्याबरोबरच युजरची आर्थिक माहिती जसे डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे विवरण, पासवर्ड, ओटीपी, मोबाईल नंबर, पत्ता, बँक खाते क्रमांक, जन्मतारीख चोरतात. याचा थांगपत्ता युजरला लागत नाही.

SCROLL FOR NEXT