देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकासाची एक सकारात्मक दृष्टी
महाराष्ट्राच्या राजकारणात जातीचे मुद्दे व्यापून आहेत, हा गैरसमज
महाराष्ट्रात नेता होण्यासाठी दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि संवेदनशीलता हे तीन गुण असावे लागतील
Pudhari VMR India Mahapoll 2025
डॉ. योगेश जाधव,
चेअरमन व समूह संपादक, पुढारी पब्लिकेशन्स प्रा. लि.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रातही सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचाही ते भाग आहेत. देवेंद्रजींकडे विकासाची एक सकारात्मक दृष्टी आहे आणि त्याच्यात शहर आणि ग्रामीण भागाकडे समदृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील २०१९ ते २०२४ ही पाच वर्षे अस्थिरता आणि अस्वस्थतेची होती. २०१४पासून महाराष्ट्राच्या विकासाने पकडलेली गती शह-काटशहाच्या राजकारणात मंदावली. २०२४ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेनेच या अस्थिरतेवर मार्ग शोधला आणि भरभक्कम बहुमताचे सरकार राज्यात सत्तेत आणले. लोकमानसात सतत मिसळणार्या, जनमानसाची नाडी माहिती असणार्या आणि प्रशासनावर पकड असणार्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या त्रयीकडे राज्याची सूत्रे आली. या तिघांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला आज ५ डिसेंबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या कामगिरीचा मागोवा घेणे, आम्हाला औचित्याचे वाटते.
माध्यमे बातम्यांनी भरून वाहत असतात. समाजमाध्यमांमुळे नेमका कोणता विषय कळीचा आहे, याविषयी सतत संभ्रम निर्माण होत राहतो. अशावेळी जनतेशीच थेट संवाद साधून त्यांना बोलते करून महाराष्ट्राची तब्येत समजून घेणे अधिक योग्य आहे, असे आमचे मत आहे. त्यातूनच महाराष्ट्रात ही पाहणी केली गेली. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले, असे आपण अभिमानाने सतत म्हणत असतो. परंतु आर्थिक सुधारणांच्या पर्वाला प्रारंभ झाल्यानंतर देशांतर्गतही एक स्पर्धात्मक वातावरण तयार झाले. आपल्या राज्याच्या हितासाठी काय निर्णय घ्यायला पाहिजे, याबाबत प्रत्येक राज्यातील सत्तेत असलेला कोणताही पक्ष अथवा मुख्यमंत्री जागरूक झाला. यातून ही स्पर्धा अधिक धारदार झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वर्चस्वाला एक नवे आव्हान उभे राहिले. ही स्पर्धात्मकता विकासाच्यादृष्टीने पोषक असते असे आमचे प्रामाणिक मत आहे. स्पर्धेमुळे आपल्या धोरणांकडे अधिक सजगतेने आणि अधिक काळजीपूर्वक पाहण्याची प्रक्रिया गती घेते.
महाराष्ट्राला याची सर्वाधिक गरज होती. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रातही सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचाही ते भाग आहेत. देवेंद्रजींकडे विकासाची एक सकारात्मक दृष्टी आहे आणि त्याच्यात शहर आणि ग्रामीण भागाकडे समदृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन आहे. पक्षाचा जनाधार भक्कम असला, जनतेचा विश्वास दृढ असला आणि केंद्राचे पाठबळ असेल तर निर्णय घेण्यासाठी एक आत्मविश्वास निर्माण होतो. ही सारी पार्श्वभूमी असल्यामुळेच महाराष्ट्रातील निर्णयप्रक्रियेला गेल्या वर्षभरात गती आली. महाराष्ट्रात जातविद्वेषाचे वातावरण निर्माण झाल्यानंतरही त्याचा प्रतिकूल परिणाम विकासाच्या अजेंड्यावर झालेला दिसत नाही. विकासाचे मुद्दे समोर आले तर जातीद्वेषाचे मुद्दे बासनात जातात, हा या पाहणीत व्यक्त झालेला विश्वास मला त्या दृष्टीने महत्वपूर्ण वाटतो. भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्त झालेला विश्वास त्यांच्यावरील जबाबदारी अधिक वाढवणारा आहे, हेही विशेषत्वाने नमूद करायला हवे.
महाराष्ट्राच्या राजकारणात जातीचे मुद्दे व्यापून आहेत, हा असाच जाणीवपूर्वक पसरवलेला गैरसमज आहे, हेही या पाहणीतून अधोरेखित झालेले आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्द्याचा पहिल्या तीनात समावेश होणे, याच्याकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा निर्माण महाराष्ट्रात होणे म्हणजे अत्यंत सुरक्षित आणि शांत, राज्य या लौकिकालाच धक्का पोचतो आहे. महाराष्ट्राचा विकास करण्याकरता जे प्रकल्प वेगाने पुढे नेले जात आहेत, त्याचे अनुकूल आणि सकारात्मक पडसाद राज्यातील जनतेच्या मनामनांत उमटायचे असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेकडे डोळेझाक करून चालणार नाही. नव्याने येणारी गुंतवणूक आज केवळ मोठे राज्य म्हणून येत नाही. गुंतवणूक करणारे त्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे, याचा बारकाईने विचार करतात. औद्योगिक वसाहतींमध्ये लूट-पाट करणार्यांना मकोका लावा, या घोषणा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना कराव्या लागतात, हीच कायदा आणि सुव्यवस्था पुरेशी नसल्याची कबुली आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला आता खिळ बसू द्यायची नसेल तर भक्कम बहुमताच्या सरकारबरोबरच उत्तम दर्जाची सुरक्षितताही महत्वाचा मुद्दा आहे, हे भान सतत ठेवावे लागेल.
ही पाहणी वाचक आणि प्रेक्षकांसमोर मांडण्याचे प्रमुख कारण म्हणजे, महाराष्ट्रातील जनता प्रगल्भ आहे, महाराष्ट्रातील राजकीय नेते परिपक्व आहेत. त्यांनी या पाहणीतून योग्य तो अर्थबोध घ्यावा, महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे पुढे नेण्यासाठी त्यांच्या पाठीशी जनमताचे पाठबळ कायम आहे, याची जाणीव करून देणे हाही एक मुद्दा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात नेता होण्यासाठी दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि संवेदनशीलता हे तीन गुण असावे लागतील, हा सांगावा देण्यासाठीही आहे. महाराष्ट्रातील सरकारला वर्षपूर्तीनिमित्त शुभेच्छा देत असतानाच काही नवी चाकोरी घालून देण्यासाठी संदेश द्यावासा वाटतो. तो संदेश या पाहणीच्या निष्कर्षातून पोचेल अशी खात्री आहे.