पुढारी तडका आर्टीकल Pudhari File Photo
संपादकीय

शाब्बास स्वप्निल..!

शाब्बास स्वप्निल..!

पुढारी वृत्तसेवा

गेल्या गुरुवारी दुपारपासूनच तुझ्या स्पर्धेकडे आमचे लक्ष लागले होते. आठ नेमबाजांमधून केवळ तीन जणांना पदक मिळणार होते. तुझे आई-वडील, कांबळवाडीचे ग्रामस्थ, संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि आमच्यासारखे तुझे असंख्य अज्ञात चाहते तुझ्या नेमबाजीकडे लक्ष ठेवून होतो. कोल्हापूरचा आमचा हा पठ्ठ्या बाजी मारणार याची आम्हाला खात्री होती, तरीही यशाने हुलकावणी देऊ नये म्हणून धाकधूकही होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत तुझी संधी अगदी थोडक्यात हुकली होती; पण निराश न होता सराव चालू ठेवत तू स्वतःलाच यशशिखरावर नेऊन ठेवले आहेस, याबद्दल मनस्वी अभिनंदन!

व्यक्तिगत पदक मिळवण्याची महाराष्ट्राची यापूर्वीची देदीप्यमान कामगिरी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये जिंकून केली होती. दिवंगत खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्निल तू पहिला मराठी खेळाडू ठरला आहेस. संघर्ष हा कोल्हापूरच्या मातीचा गुण तुझ्यामध्ये पुरेपूर उतरलेला आम्ही पाहिला. एक खेळाडू जिंकतो तेव्हा त्याच्या यशामध्ये असंख्य लोकांचा सहभाग असतो. मराठी माणसांना फारसे परिचित नसणारे खेळातील करिअर तू निवडलेस. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुझ्या आई-वडिलांचे आणि कुटुंबीयांचे अभिनंदन! आपल्या मुलाचे भवितव्य निश्चित नाही, तो जे करत आहे त्यात यश मिळेल की नाही, याची खात्री नाही. असे असतानासुद्धा तुझ्या कुटुंबीयांनी तुझ्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले आणि मग हा सगळा इतिहास घडला. आपण सर्व सामान्य परिस्थितीमध्ये राहणारे लोक असतो. प्रत्येक अडचणीवर मात करून आज तू असामान्य अशी कामगिरी केली आहेस, याबद्दल तुझ्या कुटुंबीयांचे मनस्वी अभिनंदन! तुझ्या देदीप्यमान कामगिरीमुळे आज तुझे छोटेसे गाव जगाच्या नकाशावर आले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

खेळाडूच्या यशामध्ये त्याला आजवर लाभलेल्या सर्व गुरूंचे महत्त्वाचे योगदान असते. स्वप्निल, तुला मार्गदर्शन करणार्‍या तुझ्या प्रशिक्षकांचे, समकालीन खेळाडूंचे, बालपणापासून तुझे हे गुण हेरत तुला प्रोत्साहन देणार्‍या तुझ्या सर्व गुरुजनांचेही अभिनंदन! एखाद्या खेळाडूला शासकीय स्तरावरून कसे प्रोत्साहन द्यावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय रेल्वे होय. क्रिकेटमधील बादशहा महेंद्रसिंह धोनी आणि आता ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे या दोन आणि इतर असंख्य खेळाडूंना त्यांच्या उमेदीच्या काळात रेल्वेने नोकरी देऊन त्यांचा आर्थिक ताण सोडवला आहे. नोकरीचे कुठलेही काम न देता फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित कर आणि देशासाठी अभिमानास्पद कामगिरी कर.

कोल्हापूरचे नाव जागतिक पातळीवर नेमबाजीमध्ये घेतले जाईल तेव्हा आमचा उर अभिमानाने भरून आलेला असेल. राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत यांचे ऑलिम्पिकमधील यश अगदी थोडक्यात हुकले होते. त्या सर्व नैराश्याची भरपाई करून स्वप्निल तू जो आनंद आम्हाला दिला आहेस, त्याला तोड नाही. स्वप्निल, तू आता कांबळवाडीचा किंवा कोल्हापूरचा किंवा महाराष्ट्राचा राहिलेला नसून या समृद्ध परंपरा असणार्‍या भारत देशाचा तेजस्वी सुपुत्र म्हणून उदयाला आला आहेस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT