

लाओसची राजधानी व्हिएनटाईन येथे नुकतीच आसियान परराष्ट्रमंत्र्यांची 31 वी परिषद झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी भारत आसियानमधील द़ृढ संबंधांचे महत्त्व विषद करतानाच चीन समुद्र क्षेत्रात सर्व शेजारील राष्ट्रांनी आचारसंहिता पालनावर भर दिला आहे. यंदाच्या शिखर परिषदेने सदस्य राष्ट्रांना भेडसावणार्या अनेक प्रश्नांवर विचारविनिमय केला. त्यामध्ये हवामान बदल, म्यानमार संकट, कोरोना महामारीनंतरच्या समस्या तसेच मुक्त व्यापार, आर्थिक समस्या आदींवर चर्चा झाली.
व्हिएनटाईन येथील परिषदेत भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सहअध्यक्ष या नात्याने मांडलेली भूमिका दिशादर्शक ठरणारी आहे. आसियानच्या माध्यमातून भारताने पूर्व आशियातील देशांशी संबंधांच्या विकासाचा मार्ग खुला केला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणातील नव्या गतीतत्त्वांच्या आधारे जी-20 शिखर परिषदेत जी हमी दिली होती त्याच अनुषंगाने धोरणात्मक कृती करण्यासाठी या व्यासपीठाचा खूप चांगला उपयोग झाला आहे. दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना म्हणजे आसियान ही राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मंच म्हणून काम करते. या संघटनेतील सदस्य देशांचे एकूण क्षेत्रफळ 4.5 दशलक्ष किलोमीटर आहे आणि 600 दशलक्षपेक्षा अधिक लोकसंख्येचे ही संघटना प्रतिनिधित्व करते. त्यांच्या आर्थिक विकासाचा सरासरी दर 6.5 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या संघटनेचे ब—ीद ‘एक द़ृष्टी, एक ओळख, एक समुदाय’ असे आहे. या संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे आहे. जगातील प्रभावी व शक्तिशाली संघटन म्हणून आसियानला महत्त्व असून इंडोनेशियासारख्या वर्धिष्णू अर्थव्यवस्थेचा त्यात समावेश आहे.
आसियानच्या परराष्ट्रमंत्र्यांची यंदाची बैठक आणि त्यातील प्राधान्यक्रमाचे विषय हे राजकीय आणि आर्थिकद़ृष्टीने महत्त्वाचे आहेत. पूर्व आशियात शांतता, स्थैर्य आणि सत्तेचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करणे आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील सुरक्षेवर भर देण्यासाठी सामुदायिक व्यूहरचना करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते. भारताने अॅक्ट ईस्ट पॉलिसीच्या द़ृष्टीने जी पावले टाकली आहेत ती मजबूत करण्याचा प्रयत्न या शिखर परिषदेत केला आहे. पूर्व आशियातील 18 देशांचे परराष्ट्रमंत्री या परिषदेस उपस्थित होते.
हिंद-प्रशांत क्षेत्रातील सुरक्षेच्या द़ृष्टीने भारतासाठी ‘आसियान’ला विशेष महत्त्व आहे. कृषी, आर्थिक विकास, सुरक्षा याद़ृष्टीने या परिषदेतील विचारमंथन दिशादर्शक ठरले आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आसियानमधील बैठकीपूर्वी पूर्वी थायलंड आणि मलेशिया या महत्त्वाच्या देशांना भेटी दिल्या आणि तेथील संबंधांची व्यूहरचना केली. हिंद-प्रशांत क्षेत्रातील चीनच्या हालचालींना प्रतिशह देण्यासाठी आसियान गटाला व्यूहरचनात्मकद़ृष्टीने महत्त्व आहे. त्यामुळेच मागील वर्षी जाकार्ता येथे झालेल्या या गटाच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी जाहीर केलेल्या 12 कलमी आराखड्याच्या आधारे भारताने अंमलबजावणी सुरू केली आहे. भारत आणि आसियान गटातील देशांचे निरोगी संबंध हे समान हिताच्या मुद्द्यावर आधारलेले आहेत. भविष्यकाळात हे अधिक वाढत जाणार आहे.
व्हिएनटाईन शिखर परिषदेत जयशंकर यांनी भाषणामध्ये भारताचे राजकीय, आर्थिक व सुरक्षाविषयक प्राधान्यक्रम आणि पूर्वेकडे कृती करा या धोरणाचा भाग म्हणून भारताने केलेल्या व्यूहरचनेबद्दल यथायोग्य माहिती दिली. त्यांनी असे सूत्र मांडले की, जी-20 परिषदेत भारताने एक 12 कलमी योजना घोषित केली होती आणि आसियानच्या द़ृष्टीने या योजनेला महत्त्व होते. व्हिएनटाईनमधील बैठकीत आसियानसमोरील प्रश्नांचा आणि आव्हानांचा विचार केला. तसेच राजकीय, आर्थिक व सुरक्षाविषयक कृती कार्यक्रमाला अंतिम रूप दिले. भविष्यकाळात पूर्व व आग्नेय आशियातील देशांना एकत्र करून त्यांना हिंद-प्रशांत क्षेत्रात अधिक भक्कम विकासाच्या संधी प्राप्त करून देण्याचे आसियान हे एक व्यासपीठ आहे. चीनच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि सत्ता समतोलाच्या द़ृष्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडणे हेही आसियानचे एक महत्त्वाचे लक्ष्य आहे.
जयशंकर यांनी दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात सर्व शेजारील राष्ट्रांनी आचारसंहिता पालनावर भर दिला आहे. व्हिएनटाईन शिखर परिषदेने सदस्य राष्ट्रांना भेडसावणार्या अनेक प्रश्नांवर विचारविनिमय केला. त्यामध्ये हवामान बदल, म्यानमार संकट, कोरोना महामारीनंतरच्या समस्या तसेच मुक्त व्यापार, आर्थिक समस्या इत्यादींवरही चर्चा झाली. आर्थिक विकासाचा रोडमॅप तयार केला. अर्थव्यवस्थांना नवचैतन्य देणे, अन्नसुरक्षा वाढविणे, पर्यावरण संतुलन राखणे, ऊर्जा समस्या सोडविणे, शैक्षणिक व सांस्कृतिक आदानप्रदान, क्रीडा व पारपंरिक कलांना उत्तेजन देणे या क्षेत्रातही आसियान भरीव कार्य करीत आहे. शिवाय या परिषदेत सुरक्षाविषयक मुद्द्यावर विचारविनिमय करण्यात आला आणि गरिबी निर्मूलन, दहशतवाद व अमली पदार्थांचे उच्चाटन, व्यापार व पर्यटनवृद्धी, पायाभूत सुविधांचा विकास, कनेक्टिव्हिटी संवर्धन, प्रतिजैविकांचा प्रतिकार, आपत्ती व्यवस्थापन, भ—ष्टाचाराचे निर्मूलन प्रादेशिक विकासातील भागीदारी, रेडक्रॉससारख्या संस्थांना करावयाचे सहकार्य याबाबतही विचारविनिमय झाला. भारत आसियान देशासाठी मित्र, मार्गदर्शक व तत्त्वचिंतक म्हणून नेहमीच थोरल्या भावाची भूमिका पार पाडत आहे. हीच बाब या परिषदेत जयशंकर यांनी प्रामुख्याने नमूद केली.