पुढारी File Photo
संपादकीय

पुष्पकचं यश आणि नागभूमी

पुढारी वृत्तसेवा

उदय कुलकर्णी

'पुष्पक' विमानाचा उल्लेख भारतीय पुराणात पहिल्यांदा 'रामायण' या महाकाव्यात आढळतो. धनाची देवता कुबेराकडे आधी पुष्पक विमानाची मालकी होती; पण रावणानं ते विमान ताब्यात घेतलं आणि नंतर सातत्यानं वापरलं, असा उल्लेख 'रामायणा'त सापडतो

प्राचीन हिंदू ग्रंथांत म्हणजे साधारण दहा हजार वर्षांपूर्वी युद्धात विमानांचा वापर केला जात असल्याचा उल्लेख मिळतो. 'बहुतायत' नावाच्या ग्रंथात पुष्पक विमानाचा उल्लेख आहे. प्राचीन काळात दोन प्रकारच्या विमानांचा उल्लेख मिळतो, एक म्हणजे मानवनिर्मित विमानं आणि दुसरी म्हणजे परग्रहावरून आलेल्या उडत्या तबकड्यांसारखी विमानं.

'पुष्पक' विमानाची निर्मिती भगवान विश्वकर्मा यांनी केली होती, असाही उल्लेख रामायणात आहे. अशा प्रकारचं विमान खरोखर अस्तित्वात होतं की प्राचीन ग्रंथ रचताना केलेल्या या कल्पना होत्या, हे आज छातीठोकपणे सांगणं कठीण आहे. ALVLEX

'पुष्पक' हे नाव आता चर्चेत आलं आहे, कारण नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) 'पुष्पक' नावाच्या रियुजेबल लाँच व्हेईकलचं तिसऱ्यांदा यशस्वी परीक्षण केलं. अमेरिकेनंतर अशा प्रकारच्या पुन्हा-पुन्हा वापरता येईल, अशा अंतरिक्ष संशोधनासाठी वापरायच्या विमानासारख्या वाहनाचं यशस्वी परीक्षण केवळ भारतानं आणि एलॉन मस्क यांच्या कंपनीनं केलं आहे. २३ जूनला झालं ते या 'पुष्पक'चं तिसरं परीक्षण.

२ एप्रिल २०२३ रोजी पहिल्यांदा 'पुष्पक'चं परीक्षण झालं.

२ एप्रिल २०२३ रोजी पहिल्यांदा आणि २२ मार्च २०२४ रोजी दुसऱ्यांदा 'पुष्पक'चं परीक्षण झालं. भारतीय हवाई दलाच्या चिनुक हेलिकॉप्टरच्या मदतीनं 'पुष्पक' आकाशात साडेचार किलोमीटर उंच नेण्यात आलं आणि तेथून ताशी ३२० किलोमीटरच्या गतीनं 'पुष्पक'ला जमिनीवर उतरवलं. 'पुष्पक'सारख्या वाहनामुळं भारताचा अंतराळ संशोधनाचा खर्च कमी होणार आहे.

भारतानं आतापर्यंत शेकडो कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत. हे उपग्रह नादुरुस्त झाल्यास भारताला आतापर्यंत एक तर 'नासा'ची मदत घ्यावी लागत होती किंवा अवकाशातच कृत्रिम उपग्रह नष्ट करावे लागत होते.

'पुष्पक' मुळं 'नासा'च्या मदतीशिवाय गरजेनुसार कृत्रिम उपग्रह दुरुस्त करता येऊ शकतील, तसेच जिथं गुरुत्वाकर्षण शून्य आहे, अशा ठिकाणी जीवशास्त्र व औषधशास्त्राशी निगडित प्रयोगही करता येणार आहेत. नागालँड हे खरं तर देशाच्या दृष्टीनं दुर्लक्षित राज्य; पण आता नागालैंडही देशाच्या व संशोधनाच्या प्रगतीसाठी हातभार लावू लागलं आहे. 'इस्रो'च्या 'पुष्पक' सारख्या संशोधन प्रकल्पाला यशस्वी करण्यात नागालँडमधील एका इलेक्ट्रिशियनच्या मुलाचाही मोठा वाटा आहे.

डॉ. बेलेन्सो टी. यिमचुंगर हा एका इलेक्ट्रिशियनचा मुलगा. या डॉ. बेलेन्सो यांनी आतापर्यंत अनेक वेगळे शोध लावले आहेत. केवळ आवाजाचा वापर करून वीज नियंत्रण करणारी प्रणाली ही भारतात पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी डॉ. बेलेन्सो यांनी शोधली. पुढच्या टप्प्यात 'पुंगरो' या राहत्या गावाजवळच्या जमिनीवर आणि मातीवर संशोधन करून याच डॉ. वेलेन्सो यांनी त्या मातीपासून वीज तयार केली.

याच डॉ. वेलेन्सो तसेच दिल्लीमधील ज्युनिअर इंजिनिअर राम दास आणि आयआयटीचे विद्यार्थी कुमार अशा तिघांचे 'इस्रो'चे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी 'पुष्पक'च्या यशस्वीतेसाठी विशेष आभार मानले आहेत. नागालँड या राज्याची लोकसंख्या केवळ १९ लाख ८० हजार ६०२ इतकी आहे. अँगमी व चंग या नागालँडमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा. शेती, हातमाग व विणकाम यावरच येथील नागरिक प्रामुख्यानं उदरनिर्वाह करतात; पण राज्याची साक्षरता ८० टक्क्यांवर आहे.

या नागभूमीचा इतिहास पाहायचा तर श्रीरामाच्या दोन मुलांपैकी कुश या मुलाचा विवाह नागभूमीतील मुलीशी झाला होता. रावणाच्या मेघनाद या मुलाची पत्नीही नागभूमीतील होती, तर महाभारतातील अर्जुनाची पत्नी उलुपीसुद्धा नागभूमीतील होती, असे संदर्भ मिळतात. एका अर्थी नागभूमी ही रामायण, महाभारत काळापासून भारतभूमीशी जोडलेली आहे. आता डॉ. बेलेन्सोसारखे नवे तरुण ज्या पद्धतीनं देशाच्या संशोधन क्षेत्रात योगदान देऊ लागले आहेत, त्यामुळं नागालँडकडे पाहण्याची दृष्टिकोन बदलेल यात शंका नाही!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT