भारतीय टीम File Photo
संपादकीय

T20 World Cup : सांघिक भावनेचा विजय!

पुढारी वृत्तसेवा

क्रिकेट हा तमाम भारतीयांसाठी धर्म किंवा श्वास! प्रत्येक सामन्यात आपल्या संघाने विजय मिळवावा, अशीच चाहत्यांची अपेक्षा असते. हा सांघिक खेळ आहे आणि कोण्या एकट्या दुकट्या खेळाडूच्या जोरावर विजेतेपद पटकवता येत नाही, हे पुन्हा सिद्ध झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि ‘द ग्रेट वॉल’ राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला तो संघातील प्रत्येक खेळाडूच्या अतुलनीय आणि भेदक कामगिरीच्या जोरावरच. प्रत्येकाने सोपवलेली कामगिरी आणि जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली, तेव्हा संघातील काही खेळाडूंच्या निवडीवरून टीका झाली. लोकांनी कितीही टीका केली तरी चालेल, मी मात्र संघाने सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार, हेच ध्येय प्रत्येक खेळाडूने या टीकेकडे दुर्लक्ष करीत शेवटपर्यंत ठेवले.

दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात झेल सोडल्यानंतर अर्शदीपसिंग या युवा गोलंदाजावर सातत्याने टीका झाली; मात्र याच गोलंदाजाने 17 गडी बाद केले होते. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा केवळ आयपीएलमध्ये चमक दाखवतो आणि देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यांत अपयशी ठरतो, अशी टीका करणार्‍यांना त्याने यावेळी सातत्यपूर्ण कामगिरी करीत चोख उत्तर दिले. त्याने अंतिम सामन्यात महत्त्वाचे तीन गडी बाद केले. रोहित व विराट कोहली यांच्यातही मतभेद आहेत, असे म्हटले जात होते. स्पर्धेतील सुरुवातीच्या अपयशानंतर विराट याला अंतिम सामन्यात खेळवले जाणार नाही, अशी शंका निर्माण झाली होती. विजेतेपदासाठी विराटखेरीज संघ अपुरा आहे, असे संघ व्यवस्थापनाने ठरवले आणि अंतिम 11 खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळाले.

या स्पर्धेत सातत्याने धडाकेबाज फलंदाजी करणारा रोहित हा अंतिम सामन्यात लवकर बाद झाल्यानंतर संघाच्या विजयाची जबाबदारी आपल्यावर आहे, हे ओळखूनच विराटने भरवशाची फलंदाजी केली. सुरुवातीला धडाकेबाज, नंतर सावध आणि अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आक्रमक शैलीचा वापर करीत त्याने संघासाठी आश्वासक धावसंख्या उभारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. एवढेच नव्हे, तर अक्षर पटेल व शिवम दुबे यांच्या साथीत महत्त्वाच्या भागीदार्‍या रचताना त्याने साथीदाराचीच भूमिका बजावली. अंतिम 11 खेळाडू निवडताना आपल्याला संधी देत जो संघ व्यवस्थापनाने विश्वास टाकला, त्या विश्वासास सार्थ ठरेल अशीच फलंदाजी त्याने केली. धावांचा वेग वाढवण्यासाठी अक्षर याला बढती देत वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय त्याने सार्थ ठरविला. शिवम यानेही वेग वाढवण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. पावणेदोनशे धावांच्या पलीकडे पोहोचल्यामुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला होता. सुरुवातीला मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शेवटच्या षटकापर्यंत शर्थीची झुंज देत त्यांचा ‘चोकर’ हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर क्विंटन डी-कॉक व झंझावती अर्धशतक टोलविणारा हेन्रिक क्लासेन यांनी संघाला विजयासमीप नेले होते. एका षटकात तीन षटकारांसह धावांचा पाऊस पडणारा क्लासेन हा आणखी धोकादायक होत असतानाच पंड्याने त्याला बाद करीत भारताच्या विजयाचा मार्गातील अडसर दूर केला आणि तेथूनच पुन्हा भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. तरीही मिलरने शेवटपर्यंत भारतीय चाहत्यांचा श्वास रोखून ठेवला. शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव याने त्याचा झेल घेताना दाखवलेली कल्पकता खरोखरच कौतुकास पात्र आहे. या स्पर्धेतील तो सर्वोत्कृष्ट झेल होता. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत असलेली भेदकताही महत्त्वपूर्ण ठरली. 18 व्या षटकात मार्को जॅनसेनचा त्रिफळा उडवताना केवळ दोनच धावा दिल्या. 15 गडी बाद करीत त्याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानही मिळवला.

खेळाडूंनी कीर्तीच्या शिखरावर असतानाच कारकिर्दीतून निवृत्त व्हावे, असे नेहमी म्हटले जाते. रोहित व विराट यांनीही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय अंतिम सामना झाल्यानंतर जाहीर केला. भारतीय संघाचे प्रशिक्षक द्रविड हे या स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांना भारतीय संघाने विजेतेपदाद्वारे दिलेली भेट खूपच अमूल्य आहे; कारण ते कर्णधार असताना भारताला विश्वचषक जिंकण्यात अपयश आले. हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी संघ बांधणी करताना केलेली कामगिरी अतुलनीयच म्हणावी लागेल. विश्वचषक स्पर्धा आणि अंतिम फेरी हे आफ्रिकेसाठी कायमच मृगजळ ठरले आहे. यंदा अंतिम सामन्यात हे स्वप्न ते पार करणार, असे वाटत होते. ज्याप्रमाणे भारतीय खेळाडूंनी सांघिक कौशल्य दाखवले, तसे कौशल्य दाखवण्यात त्यांचा संघ अपयशी ठरला. तरीही त्यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवताना राखलेले अपराजित्वही या स्पर्धेचा थरार आणि उंची वाढवणारे ठरले.

सतत युद्धाच्या धगधगतेमुळे ग्रासलेल्या अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरीपर्यंत मारलेली मजल कौतुकास्पद होती. चांगल्या मैदानांसह सर्वच सुविधांचा अभाव असतानाही त्यांचे खेळाडू ज्या जिद्दीने, आत्मविश्वासाने खेळले, त्यांचा आदर्श अन्य संघांनी घेण्याची गरज आहे. अमेरिकन संघानेही अव्वल आठ संघांत झेप घेत आमच्या संघातही उज्ज्वल यश मिळवण्याची क्षमता आहे, हे दाखवून दिले आहे. त्यांच्या संघात असलेला सौरभ नेत्रावलकर या मुंबईच्या खेळाडूने संगणक अभियंता या पदावर नोकरी करीतच क्रिकेटची कारकीर्द सुरू ठेवली आहे. अव्वल आठ संघांमध्ये त्यांचा संघ पोहोचल्यानंतर त्याला नोकरीच्या ठिकाणी रजा वाढवून देण्यासाठी अर्ज करावा लागला. अमेरिकेने वेस्ट इंडिजसह संयुक्त संयोजक म्हणून काम करताना या स्पर्धेचे नेटके आयोजन केले आणि आपणही विश्वचषक स्पर्धा घेऊ शकतो, याचा प्रत्यय दिला. कृत्रिम मैदानांवरही विश्वचषक सामने आयोजित करण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. स्पर्धा संयोजनातही अनेक भारतीयांचा हातभार लाभला होता. एकूणच ही स्पर्धा भारतीयांनी गाजवली आणि सतरा वर्षांनंतर विश्वचषक खेचून आणला. भारतीय संघाचे अभिनंदन.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT