पुढारी ऑनलाईन डेस्क :
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर ते तेथे स्थिरावतील, अशीही चर्चा होती. मात्र त्यांचे पक्षातील नेत्यांबरोबरील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा पश्चिम बंगालमध्ये रंगली आहे. नगरपालिका निवडणुकांमधील जागा वाटप निर्णयाबाबत प्रशांत किशोर यांच्यावर पक्षातील नेते नाराजी व्यक्त करत आहेत. याला कंटाळून आपल्याला तृणमूल काँग्रेससोबत कामच करायचे नाही, असे प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींना कळवले असून, ममता बॅनर्जी यांनीही किशाेर यांना निर्णय घ्यावा, असे सुनावले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये नगरपालिका निवडणुकांसाठी नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यावर तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चटर्जी आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुब्रत बख्शी यांनी सही होती. तर पक्षाच्या सोशल मीडिया हँडेलवर सही नसणारी यादी जाहीर करण्यात आली. उमेदवारांच्या वेगवेगळ्या याद्या जाहीर झाल्याने राज्यातील विविध भागात याविरोधात निदर्शने करण्यात आली. नाराज कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी पक्षाच्या नेत्यांविरोधात जोरदार निदर्शनेही केली. यावरुन प्रशांत किशाेर आणि तृणमूल नेत्यांमधील मतभेद स्पष्ट झाले. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने कार्यकर्ता तक्रार निवारणासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये समन्वय समितीची स्थापना करण्याची घाेषणा केली. यावरही प्रशांत किशोर यांनी नाराजी व्यक्त केली. पक्ष निर्णयांमध्ये स्थान मिळत नसल्यानेही प्रशांत किशोर नाराज असल्याची चर्चा तृणमूल काँग्रेस वर्तुळात रंगली आहे.
पार्थ चटर्जी आणि सुब्रत बख्शी यांनी जाहीर केलेली यादीच अंतिम आहे. आम्ही सर्वांना खूष करु शकत नाही, असे स्पष्ट करत अंतिम निर्णय हा पक्षाचे महत्वपूर्ण नेतेच घेतील, असे महापालिका उमेदवार यादीच्या गोंधळाबाबत बोलताना ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशांत किशाेर आणि तृणमूल काँग्रेसमधील मतभेद आणखी वाढतील, असे मानले जात आहे.
हेही वाचलं का?