पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थी आणि व्यक्ती युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत. यांना युक्रेनमधून सुरक्षितरित्या बाहेर काढत मायदेशी परत आणण्याासाठी भारत सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. पण, अशा परिस्थितीतही रौनक रावल (Raunak Raval) नावाच्या भारतीय तरुणाने आपला जीव धोक्यात घालून युक्रेनमध्ये अडकलेल्या काही महिलांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.
रौनक रावल आपला संपर्क क्रमांक देऊन युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आपला जीव धोक्यात घालून मदत करत आहे. त्याने दोन महिन्यांच्या बाळासहीत एका आईला आणि एका महाविद्यालयीन तरुणीला सुखरुपरित्या युक्रेनच्या बाहेर आणलेले आहे. या कामामुळे रौनक रावलचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
रौनक (Raunak Raval) म्हणतो की, "आज मी पुन्हा युक्रेनमध्ये आलो आहे. कारण, दोन महिन्यांच्या बाळासहीत एक आई युक्रेनमध्ये अडकलेली होती, ते पाहून मला राहवलं नाही. त्यामुळे बाळासहीत आईला वाचविण्यासाठी मी पुन्हा युक्रेनमध्ये आलो." रौनकने सुखरुपणे बाहेर काढलेल्या दोन महिन्याच्या बाळाच्या आईने आभार मानताना सांगते की, "मला दोन महिन्यांचं बाळ आहे. रौनक हे माझ्यासाठी देवासारखे धावून आहे. कारण, मी एकदाच फोन केला आणि ते अवघ्या ५ मिनिटांच्या आत माझ्याकडे आले. माझ्यासाठी ही रौनक यांनी केलेली मदत खूप महत्वाची आहे. तुम्ही अडचणीत असाल, तर रौनक यांना फोन करा, ते तुमच्याही मदतीला धावून येतील. पुन्हा एकदा रौनक यांचे खूप खूप आभार."
त्याचबरोबर रौनक यांनी युक्रेनमधून सुखरुपरित्या युक्रेनच्या बाहेर काढलेल्या तरूणीनेही आपलं मत व्यक्त केलं आहे की, "मी सोनाली आहे. मी खार्किव्हमधून चालत प्रवास करत होते. आम्ही दोन-तीन दिवसांपासून झोपलेलो नाही. आम्ही सीमेवर उणे चार तापमानात मदतीची वाट पाहत उभे होतो. इतक्यात आमच्या मदतीला रौनक धावून आले आणि त्यांनी माझा जीव वाचवला. ही घटना मी आयुष्यातून कधी विसरू शकत नाही."